यात्रा समितीची भूमिका दुटप्पीपणाची !
By admin | Published: April 26, 2016 09:10 PM2016-04-26T21:10:18+5:302016-04-27T00:57:50+5:30
महालक्ष्मी मंदिर वाद : गडहिंग्लजच्या नगरसेवकांचा आरोप; मंदिराच्या विकासाला विरोध नाही
गडहिंग्लज : एकीकडे मंदिर विकासाला विरोध नाही, निधी परत जावा अशी आमची भूमिका नाही, असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला शासनाकडून तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामास विरोध करणे ही यात्रा समितीची भूमिका दुटप्पीपणाची आहे. केवळ विरोधाला विरोध म्हणून दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालण्याबरोबरच मिळालेल्या निधीतून शहराचा विकास करून घेण्यासाठी नागरिकांनी नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी प्रसिद्धिपत्रकातून केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत गडहिंग्लज नगरपालिकेस शासनाकडून पाच कोटी ६९ लाखांच्या कामासाठी चार कोटी २६ लाख अनुदान मिळाले आहे. यापैकी एक कोटी २७ लाखांचे बेलबाग आश्रम आणि २४ लाख ५० हजार खर्चाचे नदीवेशीतील पिराची मुल्ला मस्जीद परिसर विकासाचे काम पूर्ण झाले आहे.
गडहिंग्लज बसस्थानक ते तीर्थक्षेत्र स्थळापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण, गटर बांधकाम व फूटपाथवरील पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे दोन कोटी १४ लाखांचे कामही पूर्ण झाले आहे. तसेच मारुती मंदिर सभागृह बांधकामासाठी १८ लाख १७ हजार आणि विठ्ठल मंदिर सभागृह व भक्त निवासासाठी ३० लाख ४८ हजार मंजूर आहेत. ही दोनही कामेही जवळपास पूर्ण झाली आहेत. विठ्ठल मंदिर येथील अंशत: राहिलेले काम पूर्ण करून घेण्याचे ट्रस्टींनी मान्य केले आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी एक कोटी २१ लाख मंजूर आहेत. त्यापैकी सभामंडपासाठी ५१ लाख ४९ हजार, स्टेजसाठी १९ लाख ५१ हजार, प्राथमिक शाळा/ धर्मशाळा बांधकामासाठी ६९ लाख ६५ हजार इतका निधी मंजूर आहे. या कामांमुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
महालक्ष्मी मंदिरात निधी परत जाऊ नये, यासाठी विधायक
सूचना मांडण्यासाठी नागरिक, ट्रस्टी व यात्रा समिती यांची संयुक्त बैठक बोलावली होती. मात्र, तत्पूर्वीच पत्रकबाजी करून या विकासकामांना विरोध करण्याचा प्रयत्न यात्रा समितीने केला. बैठकीत विकासकामांबाबत चर्चा न करता उपस्थित काही मंडळींनी चर्चेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची भूमिका दुटप्पी आहे. केवळ व्यक्तिद्वेषातून राजकीय स्वार्थापोटी त्यांचा विरोध आहे. त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता आहे, असेही नगरसेवकांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धिपत्रकावर नगराध्यक्ष राजेश बोरगावे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, बांधकाम सभापती नितीन देसाई, नगरसेवक बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, दादू पाटील,
रामदास कुराडे, किरण कदम, हारूण सय्यद, बाळू वडर, उदय पाटील, प्रा. स्वाती कोरी, सरिता भैसकर, मंजूषा कदम, लक्ष्मी घुगरे व सुंदराबाई बिलावर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
शाळेचा उपद्रव आताच कसा?
महालक्ष्मी मंदिराच्या आवारात सुमारे १०० वर्षांपासून धर्मशाळा व प्राथमिक शाळा अस्तित्वात आहे. या शाळेचा यापूर्वी झालेल्या अनेक महालक्ष्मी यात्रांना उपद्रव झालेला नव्हता. त्यामुळे शहरातील गोर-गरिबांची मुले शिकणाऱ्या शाळेचा आताच कसा उपद्रव होतो? असा सवाल नगरसेवकांनी पत्रकातून विचारला आहे.