देशभरातील बालकांना ‘रोटाव्हायरस’ची लस देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:53 AM2019-04-30T00:53:43+5:302019-04-30T00:53:48+5:30
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : डायरियासाठी कारणीभूत ठरणाऱ्या रोटाव्हायरसला प्रतिबंध करणारी ‘रोटासील’ ही लस देशभरातील सर्व ...
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : डायरियासाठी कारणीभूत ठरणाऱ्या रोटाव्हायरसला प्रतिबंध करणारी ‘रोटासील’ ही लस देशभरातील सर्व बालकांना मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या आजारामुळे प्रतिवर्षी ७८ हजार बालकांचा मृत्यू होतो. सध्या याबाबतचे प्रशिक्षण सुरू असून, १५ मे नंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
डायरियामुळे १ ते ५ वयोगटांतील बालकांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आजारामध्ये अंगातील पाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊन बालकाला अशक्तपणा येतो. वय लहान असल्याने तोंडावाटे फारसे काही घेतले जात नाही. परिणामी त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. एकीकडे याचा खर्चही अधिक येत असताना दुसरीकडे हे बालक कुपोषित राहण्याची शक्यता असते.
यावर उपाय म्हणून ज्यामुळे डायरिया होतो, त्या रोटाव्हायरस या व्हायरसला प्रतिबंध करणारी ही लस देण्यात येणार आहे. पावडरपासून तयार करण्यात येणारी ही लस इंजेक्शनच्या माध्यमातून तोंडात सोडली जाणार आहे.
लसीकरण पूर्णपणे मोफत
सध्या ही लस खाजगी दवाखान्यांमध्ये एक हजारहून अधिक किंमत आकारून दिली जाते; मात्र केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये या लसीकरणाचा समावेश झाल्याने याची कोणतीही किंमत आकारली जाणार नाही. बाळाच्या जन्मानंतर ६, १0 आणि १४ आठवड्यांनंतर ही प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.
सध्या सुरू असलेले लसीकरण
१ बीसीजी (क्षयरोग), २ पोलिओ,
३ पेन्टा (मेंदूज्वर, कावीळ),४ कावीळ,
५ एम. आर. (गोवर रूबेला), ६ डीपीटी लस (त्रिगुणी), ७ टीटी (धनुर्वात), ८ आयपीव्ही (इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन) या आठ लसींबरोबरच आता ही नववी लस दिली जाणार आहे.
डायरियामुळे देशभरातील ७८ हजार बालकांचा मृत्यू होत असल्याने या रोटाव्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा निर्णय केंद ्रशासनाने घेतला आहे. या लसीकरणामुळे हजारो बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका टाळणे शक्य होणार आहे.
- डॉ. फारूक देसाई, माता बालसंगोपन अधिकारी,
जिल्हा परिषद कोल्हापूर