रॉट विलर, ग्रेहाऊंड, डामिशियनने जिंकली मने
By admin | Published: April 2, 2017 11:08 PM2017-04-02T23:08:38+5:302017-04-02T23:08:38+5:30
अजिंक्य कृषी प्रदर्शन : जातिवंत श्वान पाहण्यासाठी अलोट गर्दी; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
सातारा : सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राज्यस्तरीय अजिंक्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शनानिमित्त आयोजित केलेल्या ‘डॉग शो’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत विविध जातींचे ९३ श्वान सहभागी झाले. जातिवंत श्वानांना पाहण्यासाठी आबाल वृद्धांसह महिलांनीही गर्दी केली होती.
जिल्हा परिषद मैदानावर सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने व महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा, कृषी व पशुसंवर्धन विभाग, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना यांच्या सहकार्याने आयोजित अजिंक्य कृषी प्रदर्शनात ‘डॉग शो’चे आयोजन करण्यात आले. ‘डॉग शो’ मध्ये विविध जातींचे ९३ श्वान सहभागी झाले होते. यामुळे ही स्पर्धा ११ गटांमध्ये घेण्यात आली. डॉबरमन ८, जर्मनशेफर्ड ३, कारवान २७, युटीलिटी २५, लॅबराडोर ८, ग्रेटडेन ४, डामिशियन ६, बॉक्सर १, रॉट विलर ३, ग्रेहाऊंड ११, पश्मी ४ आदी जातिवंत श्वानांनी उपस्थितांची मने जिंकली. श्वानांच्या भारदस्त शरीरयष्टी आणि दणकेबाज आवाजाने परिसर हादरून जात होता. डॉग शोच्या निमित्ताने प्रदर्शनाला एक वेगळीच रंगत आली. आबाल वृद्धांसह युवती आणि महिलांनीही डॉग शोमधील श्वानांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
गटनिहाय फेरी सुरू झाल्यानंतर परीक्षकांनी संबंधित श्वानाच्या जातीचे गुण वैशिष्ट्य, गुणधर्म याचे परीक्षण केले. तसेच श्वानाचे संगोपन, लसीकरण, जंतनिर्मूलन, त्याचा आज्ञाधारकपणा आदींची तपासणी करून गुण ठरवले. परीक्षक म्हणून डॉ. कादर भाई, डॉ. दीपक माने, डॉ. संदीप जाधव, डॉ. अनिल घोडके, डॉ. सुदर्शन कांबळे, डॉ. मुकुंद वाटेगावकर, डॉ. प्रवीण अभंग यांनी काम पाहिले. डॉ. रुपाली अभंग, डॉ. लियाकत शेख यांनी डॉग शोचे संयोजन केले.
स्पर्धेतील विजेत्यांना बाजार समितीचे सभापती अॅड. विक्रम पवार, उपसभापती बाबासाहेब घोरपडे, सदस्य नितीन कणसे, रमेश चव्हाण, चंद्रकांत जाधव, किरण साबळे- पाटील, हेमंत सावंत, अलका पवार, शालन कदम, नानासो गुरव, रघुनाथ जाधव, श्रीरंग देवरुखे, सतीश माने, शैलेंद्र आवळे, अशोक चांगण, सुनील झंवर, सोमनाथ धुमाळ, अनिल जाधव, शंकरराव कीर्दत, नितीन शिंगटे, भिकू भोसले, युवराज पवार आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. (प्रतिनिधी)
महिलांना मार्गदर्शन
शिबिरात बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सुजीत शेख यांनी मार्गदर्शन केले. जालना कृषिनिष्ठ पुरस्कार विजेत्या सीताबाई मोहिते यांनी ‘महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती कशी साधावी,’ यावर सविस्तर मार्गदर्शन करून महिलांना सबलीकरणाचा संदेश दिला.
कृषी प्रदर्शनात आयोजित श्वान स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.