पंचगंगेतील बंधारा वाहून गेल्याने धावपळ
By admin | Published: April 25, 2016 10:08 PM2016-04-25T22:08:06+5:302016-04-26T00:43:01+5:30
वाळूच्या पोत्यांचा बंधारा बांधण्याचे काम सुरू : सभापती, अतिरिक्त मुख्याधिकारीसह ५० कर्मचाऱ्यांची यंत्रणा कार्यरत
इचलकरंजी : राधानगरी धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगामुळे येथील पंचगंगा नदीपात्रातील वाळू व मातीचा तात्पुरता बंधारा वाहून गेला. अचानक घडलेल्या या प्रकाराने नगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्याकडील यंत्रणेची धावपळ उडाली. दरम्यान, शहरासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा साठा अबाधित ठेवण्यासाठी वाळूचा पोत्याचा बंधारा बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. बंधारा बांधण्याच्या या कामावर पालिकेचे ५० कर्मचारी व दोन जेसीबी अशी यंत्रणा सायंकाळी उशिरापर्यंत कार्यरत होती. या कामावर पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, अभियंता संजय बागडे, शिवाजी लोखंडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे, बंडोपंत मुसळे जातीने लक्ष ठेवून होते. उन्हाळ्यात कृष्णा व पंचगंगा या दोन्ही नद्यांमधील पाण्याची पातळी खालावल्यामुळे या दोन्ही नद्यांवरून असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे पंप उघडे पडतात. परिणामी शहराचा पाणीपुरवठा खंडित होतो. यंदा पाऊस कमी झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईची तीव्रता भासू नये, यासाठी पंचगंगा नदीमधील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यास नगरपालिकेच्या वतीने बरगे घालण्यात आले. तर अधिक पाणीसाठा व्हावा, यासाठी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला वाळू व मुरूम यांचा भराव करण्यात आला. त्यामुळे पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसा चालू राहिला. राधानगरी धरणातून सद्य:स्थितीस पंचगंगा नदीमध्ये १४०० क्युसेस क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोमवारी पहाटे येथील पंचगंगा नदीपात्रात आले. पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. ही माहिती मिळताच सभापती दिलीप झोळ, नगरसेवक चोपडे, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, आदींनी नदीकडे धाव घेतली. नगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडील ५० कर्मचारी व दोन जेसीबी मागविण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने वाहून जाणारी वाळू नदी घाटावर काढून तिचा साठा केला. तर कर्मचाऱ्यांनी वाळूची पोती भरून ठेवली. दुपारनंतर पाण्याचा प्रवाह कमी झाला असता बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला वाळूची पोती रचून ठेवण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे पंचगंगा नदीत पाण्याचा साठा झाल्याने तेथून रात्री उशिरा दोन्ही पंपांतून पाणी उचलण्यास सुरूवात झाली. (प्रतिनिधी)