गोल केला अन् जाळे फाटले
By admin | Published: January 5, 2015 12:31 AM2015-01-05T00:31:22+5:302015-01-05T00:42:14+5:30
यांनी घडविला कोल्हापूरचा फुटबॉल...
पाटाकडील तालीम मंडळाविरोधात ‘शिवाजी’चा सामना सुरू होता. सामन्यात ‘पाटाकडील’कडून बाळ निचिते गोलरक्षक होते. मी पेनल्टी क्षेत्रातून डाव्या बाजूने चढाई करत थेट गोल जाळ्यात जोरदार फटका मारत गोल केला. निचिते यांनी मुख्य पंचांना जाळे फाटल्याचे निदर्शनास आणून दिले, असे एक ना अनेक किस्से शिवाजी तरुण मंडळ व एस. टी. महामंडळाचे माजी फुटबॉलपटू शिवाजी इंगवले (बालग) सांगत होते.
१ फेबु्रवारी १९७९ मध्ये पाटाकडील तालीम मंडळ विरोधात आमच्या शिवाजी तरुण मंडळाचा सामना शाहू स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात मी पेनल्टी क्षेत्रात अगदी जिवाच्या आकांताने गोलपोस्टच्या दिशेने जोरदार फटका लगावला. या फटक्यामुळे गोलबरोबर जाळेही फाटले. जाळे फाटल्याचे गोलरक्षक बाळ निचिते यांनी मुख्य पंच हंजाप्पा औरसंगे यांना कॉल करून दाखविले. दुसऱ्या दिवशी गांधी मैदान येथे प्रॅक्टिस क्लबशी गाठ पडली. हा सामना तीन दिवस चालला, पण कोणत्याही संघास गोल करता आला नाही. तिसऱ्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणात प्रॅक्टिसच्या चंचल देशपांडे यांनी हाताने गोल केला.
२४ आॅगस्ट १९७९ रोजी मी न्यू कॉलेजचे प्रतिनिधित्व करत होतो. समोर लॉ कॉलेजकडून माजी मंत्री दिग्विजय खानविलकर गोलरक्षक म्हणून उभारले होते. या सामन्यात आमच्या संघाने लॉ कॉलेज संघावर ७-० अशी मात केली. त्यामध्ये मी तीन गोल करत हॅट्ट्रिक साधली होती. मी आक्रमक खेळत असल्याने माझे वडील कधीही माझा सामना पाहण्यास आले नाहीत. माझा खेळ पाहून स्वर्गीय शशिकांत नरके यांनी मला पंचवीस रुपयांचे बक्षीस दिले. त्यातील १४ रुपये २५ पैशांचा महाद्वार रोडवरील कामत रेस्टॉरंटमध्ये मंडळातील खेळाडूंना नाष्टा दिला.
माझा खेळ पाहून मला अरुण नरके यांनी प्रथम शिवाजी तरुण मंडळाच्या वरिष्ठ संघात खेळण्याची संधी दिली, तर मला बूट कसे घालायचे याची शिकवण माझे बंधू जयसिंग इंगवले यांनी दिली.
- शब्दांकन : सचिन भोसले