दरोडेखोरांचा धुमाकूळ; मारहाणीत दोघे जखमी

By admin | Published: October 28, 2014 12:08 AM2014-10-28T00:08:09+5:302014-10-28T00:20:21+5:30

खटाव तालुक्यातील घटना : पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

Rowdy trash; Two injured in the attack | दरोडेखोरांचा धुमाकूळ; मारहाणीत दोघे जखमी

दरोडेखोरांचा धुमाकूळ; मारहाणीत दोघे जखमी

Next

वडूज : खटाव तालुक्यातील नडवळ, अंबवडे या दोन गावांतील तीन ठिकाणी काल, रविवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. धारदार शस्त्रांचा धाक दाखवून चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांच्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अंबवडे येथील आटोळी वस्तीवर राहणाऱ्या सुभाष साहेबराव पवार (वय ३९) यांच्या घरात रात्री पाऊणच्या सुमारास चोरट्यांनी कडी काढून प्रवेश केला. पवार, त्यांची पत्नी व तीन मुलींना जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा केला.
एका चोरट्याने माधुरी (१५) या मुलीच्या गालावर सँडल फेकून तिला जखमी केले, तर सुभाष पवार यांच्या बोटावर दुसऱ्याने धारदार शस्त्राने वार केला. चोरट्यांनी घरातील पेटीतील चाळीस हजारांची रोकड, दोन मोबाईल, घड्याळ असा ४२ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. त्याच रात्री अंबवडे येथील चावडीशेजारी वास्तव्यास असणाऱ्या संजय नामदेव कोळी (दहातोंडे) यांच्या घरात दोन चोर मध्यरात्री घुसले व तीनशे रुपये रोख आणि मोबाईल चोरून नेला. घरातील लोक जागे झाल्याने चोरटे पळून गेले. रात्री पावणेदोनच्या सुमारास नढवळ येथील श्रीकांत जालिंदर झेंडे यांच्या घराची कडी कटावणीने उचकटून चोरट्यांनी साडेदहा हजारांची रोकड व एक लाख २० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी मोबाईल आणि एटीएम कार्डही चोरून नेले.
या चोऱ्यांबाबत वडूज पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल झाल्या असून, पोलीस निरीक्षक यू. एस. वाळके तपास करीत आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक डुंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तपासासाठी श्वानपथकास पाचारण केले.


महिलांचा गोंधळ
या घटनांच्या तपासासाठी काही संशयितांना तालुक्याच्या विविध भागांतून पकडून आणण्यात आले होते; मात्र काही महिलांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करून गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना काहीच हालचाल करता
आली नाही.

Web Title: Rowdy trash; Two injured in the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.