‘स्वयंवरा’चा शाही सोहळा
By admin | Published: January 29, 2015 09:49 PM2015-01-29T21:49:59+5:302015-01-29T23:42:14+5:30
राज्य नाट्य स्पर्धा : ‘राधाकृष्ण’चे सादरीकरण--राज्य नाट्य स्पर्धा
सं. स्वयंवर हे महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सादर झालेले दहावे नाटक. कै. कृष्णाजी खाडीलकर यांच्या लेखणीतून साकार झालेले हे नाटक रत्नागिरीच्या राधाकृष्ण कला मंचने सादर केले.
नाथ हा माझा, सुजन कसा मन चोरी, रुपबली तो जा, भय न मम मना, यदुमनी सदना, मम मनी कृष्णसखा रमला, गुरु सुरस गोकुळी, नृपकन्या तव जाया, कांता मजसी तुची, रमणी मजसी नीजधाम अशा अवीट गोडीची गायनाला कठीण असलेली पदे या नाटकात आहेत. या गाण्याचे वेगवेगळे ताल व राग समजून घेऊन ती नाट्य संगीताच्या बाजात सादर करणे हे शिवधनुष्यच मानले जाते. या नाटकातील नाट्यपदे सादर करुन हे नाटक सादर करायला कोणीही धजावत नाही. परंतु रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचने शिवधनुष्य पेलले.
प्रेरणा दामले (रुक्मिणी) यांनी गायनाबरोबरच अभिनयातही आपला ठसा उमटवला. नाटकातील गायकी अंगाची जवळजवळ १२ ते १३ गाणी सादर करुन प्रमुख भूमिका साकारण्यासाठी मोठे धैर्य लागते. शिवाय पौराणिक कथेतील भूमिका साकारताना देहबोलीवर विशिष्ट प्रकारचे नियंत्रण असावे लागते. या सर्वांचे भान ठेवून प्रेरणा दामले यांनी दर्जेदार रुक्मिणी साकारली.
अनुप बापट (श्रीकृष्ण) यांनी संगीत नाटकात स्वयंवर या नाटकाद्वारे पदार्पण केल्याचे समजले. तरीही त्यांनी श्रीकृष्ण चांगला साकार केला. गायनावर विशेष मेहनत घेतल्याचे जाणवले. सुंदर मुखललना, कांता मजसी तूची, गुरु सुरस गोकुळी, सुधा दही दुधी यांसारखी पदे जी मोठ्या गायकांनी आधीच प्रसिद्ध करुन ठेवली आहेत ती पदे चांगली पेलली.
संगीत दिग्दर्शक विलास हर्षे यांनी नाटकाला सुंदर संगीत दिग्दर्शन केले. नाट्यसंगीताचा डौल, बाज कायम ठेवून, स्वत:ची प्रतिभासुद्धा दाखवून दिली. उदय गोखले (व्हायोलिन), मिलिंद टिकेकर (तबला), मंदार जोशी (बासरी), विलास हर्षे (आॅर्गन) यांनी परस्पर समन्वयाने समर्पक अशी साथसंगत केली.
नेपथ्य, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा यावरही विशेष लक्ष दिले गेले. रुक्मिणीचे कोकीळेशी हितगूज, रुक्मिणीचे गाणे ऐकून जमा झालेल्या गायी, मंदार जोशींची घुमलेली बासरी खरंच लाजवाब.
नाटकाची मूळ संहिता वाचल्यानंतर असे लक्षात येते की, सगळे नाटक सादर करण्यासाठी जवळजवळ पाच ते साडेपाच तास लागतात. परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता मूळ संहितेतील काही पदे, कथानकाचा काही भाग वगळण्यात आला. समीधा मुकादम (स्नेहलता), पूर्वा खालगावकर (महाराणी), किरण जोशी (शिशुपाल), विनित घाणेकर (रुक्मी), अभय मुळ्ये (भीष्म) व सहकालाकारांनी आपापली कामगिरी सुंदर पार पाडली.
प्रत्येक कलाकाराने वैयक्तिक कामगिरी चांगली पार पाडल्यामुळे सांघिक परिणाम मिळाला. प्रेरणा दामले (रुक्मिणी) व अनुप बापट (कृष्ण यांना प्रत्येकी एकवेळा तांत्रिक अडथळा व रंगभूषेतील अडथळा आला. पण, तरीही त्यांनी प्रसंगावधान राखून वेळ मारुन नेण्याचे मोठे धैर्य दाखवले. एकंदरीत राधाकृष्ण कला मंचाच्या कलाकारांनी स्वयंवराचा सोहळा दिमाखात सादर केला.
संध्या सुर्वे