शाही दसरा उत्साहात!

By Admin | Published: October 12, 2016 06:29 AM2016-10-12T06:29:42+5:302016-10-12T06:29:42+5:30

आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार..घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीर निवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानी

Royal Dasara enthusiast! | शाही दसरा उत्साहात!

शाही दसरा उत्साहात!

googlenewsNext

कोल्हापूर : आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार..घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीर निवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानी, कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, युवराज यांच्या पारंपरिक वेषातील उपस्थिती, आरतीनंतर बंदुकीच्या फैरी झाडून देवीला दिलेली सलामी, आकर्षक आतषबाजी अशा नयनरम्य वातावरणात कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा पार पडला.
दसरा चौकातील या प्रमुख सोहळ््यात झालेल्या शाही सीमोल्लंघनाने करवीरवासीयांच्या डोळ््याचे पारणे फिटले. त्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व आबालवृद्धांनी एकमेकांना आपट्याची पाने देऊन ‘‘सोनं घ्या, सोन्यासारखं राहा’’ अशा शुभेच्छा देत सोने लुटले.
कोल्हापूरचा शाही दसरा म्हणजे देशवासीयांचे आकर्षण. संस्थान खालसा झाले असले तरी येथील संस्थानकालीन परंपरा आजही सुरू असून त्यातला महत्त्वाचा उत्सव म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव. त्याची सांगता दसरा चौकात सोने लुटून होते. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजता अंबाबाई आण तुळजाभवानी देवीच्या पालख्यांनी लव्याजम्यानिशी दसरा चौकाकडे प्रस्थान ठेवले. दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, बाळराजे शहाजीराजे, यौवराज यशराजे यांचे मेबॅक कारमधून सोहळास्थळी आगमन झाले. त्यानंतर पोलीस बँडने देवीला मानवंदना दिली. शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर सहा वाजून बारा मिनिटांनी बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ््याला सलामी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सोने लुटले.
छत्रपतींनी मेबॅक कारमध्ये उभे राहून कोल्हापूरकरांकडून सोने स्वीकारले. त्यानंतर जुना राजवाड्यात दसऱ्याचा दरबार भरविण्यात आला. अंबाबाईची पालखी आपल्या लव्याजम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदी घाट, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतली. रात्री पालखी सोहळा संपन्न झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Royal Dasara enthusiast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.