‘रिपाइं’ चळवळ व्यापक करणार
By admin | Published: May 13, 2014 12:48 AM2014-05-13T00:48:47+5:302014-05-13T00:48:47+5:30
रामदास आठवले यांचे प्रतिपादन : कोल्हापुरातील चिंतन शिबिरात साधला सुसंवाद
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाशी कुठेही तडजोड न करता रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियामध्ये सर्व समाजाला सामावून घेऊन एक व्यापक चळवळ उभी करणार असल्याचे प्रतिपादन ‘रिपाइं’चे नेते खासदार रामदास आठवले यांनी केले. ‘रिपाइं’ कोल्हापूर शाखेच्यावतीने आंबेडकरी चळवळीतील विचारवंत आणि रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे संचालक डॉ. कृष्णा किरवले होते. आठवले म्हणाले, राजकारणाशिवाय मागासवर्गीयांची उन्नती करता येणार नाही. डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाशी कुठेही तडजोड न करता महायुतीमध्ये गेलो आहे. समान कार्यक्रमावर आम्ही एकत्र आलो आहे, हे जरी खरे असले तरी बाबासाहेबांच्या घटनेला कोणालाही हात लावू देणार नसल्याचा इशारा महायुतीला दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला पहिल्यांदा पाठिंबा दिला. मराठा, ब्राह्मण समाजातील अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्यासाठी आरक्षण गरजेचे आहे. असे धोरण स्वीकारल्यानेच मराठा, जैन, ब्राह्मण समाजातील अनेक नेत्यांसह सेवानिवृत्त अधिकारी ‘रिपाइं’कडे येत आहेत. ‘बदलते राजकारण, अर्थकारण, संस्कृती आणि ‘रिपाइं’ची भूमिका’ या विषयावर बोलताना डॉ. कृष्णा किरवले म्हणाले, सर्व जाती-धर्मांच्या माणसांना पुढे नेण्याचे तत्त्वज्ञान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. या तत्त्वज्ञानाचा अवलंब करून वाटचाल केली तर यश निश्चित आहे. ‘रिपाइं’ हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील असल्याने धर्मनिरपेक्षतावादी आहे. त्यामुळे महायुतीत सहभागी झाल्याने कदाचित ती संकल्पना कमकुवत होईल, असे वाटणे साहजिकच आहे, पण रिपब्लिकन पक्ष डॉ. आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान व विचार यांच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता अथवा भविष्यात तडजोड केली जाणारच नाही, अशा ठाम विश्वासाने महायुतीत सहभागी झाला आहे. सामाजिक हितासाठी राजकीय सत्ता मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आंबेडकरी जनतेच्या व आंबेडकरी चळवळीच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. यावेळी आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक वामन होवाळ, अच्युत माने, मंगलराव माळगे, अॅड. गौतम भालेराव, काकासाहेब खंबाळकर, आदींनी विचार मांडले. प्रा. शहाजी कांबळे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कांबळे, अशोक गायकवाड, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)