कोल्हापूर जिल्हा परिषदेचे बजेट ३८ कोटींचे : सदस्याला सहा लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:52 AM2019-03-07T00:52:11+5:302019-03-07T00:52:39+5:30

जिल्हा परिषदेचा सन २0१९/२0चा ३८ कोटी ७ लाख ४८ हजार रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत सादर केला.

 Rs. 38 crores budget for Kolhapur Zilla Parishad: Rs | कोल्हापूर जिल्हा परिषदेचे बजेट ३८ कोटींचे : सदस्याला सहा लाखांचा निधी

जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे आरोग्य केंद्रांत सीसीटीव्ही


कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा सन २0१९/२0चा ३८ कोटी ७ लाख ४८ हजार रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत सादर केला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक होत्या.
या अर्थसंकल्पानुसार प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला आपल्या मतदारसंघासाठी सहा लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. यावेळी घाटगे यांनी विधायक योजनांचा आढावा घेतानाच काही नावीन्यपूर्ण योजनांची मांडणी केली. मूळ अंदाजपत्रकापेक्षा आठ कोटी ५८ लाख रुपयांची वाढ झाली असून, यामध्ये १३ कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश असल्याचे घाटगे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांचा नागपूर कृषी आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठावर निवड झाल्याबद्दल शौमिका महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, विशांत महापुरे उपस्थित होते. यानंतर झालेल्या चर्चेमध्ये अनामत रकमांचा मुद्दा सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. त्याला मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने यांनी उत्तर दिले. बजरंग पाटील यांनी गगनबावड्यातील दुष्काळी गावांचा विचार करण्याचे आवाहन केले. तर अंगणवाड्यांना रंगवण्यापेक्षा पाणी देणे महत्त्वाचे असल्याचा मुद्दा राहुल आवाडे यांनी मांडला. यावर ज्या अंगणवाड्यांमध्ये लाईट आहे, तेथे आरओ सिस्टीम देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वैयक्तिक लाभाच्या योजनांची पत्रे उशिरा दिल्याने आणि आचारसंहितेआधी वस्तू खरेदी करण्याची सक्ती केल्याने लाभार्थ्यांना याचा फटका बसत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हातकणंगले येथे गटविकास अधिकारी उपस्थित नसल्याचे विजया चौगुले यांनी सांगितले.

शिरोळ, हातकणंगले आणि अन्य तालुक्यांत अनेक पाणी योजना मंजूर झाल्या आहेत; मात्र तांत्रिक अधिकारी एकच आहे. याचा विपरित परिणाम योजनांच्या कामांवर होणार आहे. तेव्हा खाजगी मनुष्यबळ घेण्याची मागणी राजवर्धन निंबाळकर यांनी केली. यावेळी स्मिता शेंडुरे, अनिता चौगुले, शिल्पा पाटील यांनी चर्चेत भाग घेतला.

सभापतींच्या जेवणाला विरोधक अनुपस्थित
अर्थ समिती सभापती अंबरीश घाटगे यांनी सभापती निवासस्थानाजवळ मंडप उभारून आज सदस्यांना भोजन ठेवले होते; परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य या जेवणासाठी आले नाहीत; त्यामुळे सभागृहात त्यांना भोजन देण्यात आले.



अंबरीश घाटगे, सतीश पाटील यांच्यात चकमक
कोल्हापूर : करंबळी, ता. गडहिंग्लज येथील ग्रामपंचायतीने बँकेला दिलेल्या जागेवरून शिक्षण सभापती अंबरीश घाटगे आणि जि. प. सदस्य सतीश पाटील यांच्यात बुधवारी सर्वसाधारण सभेत हमरीतुमरी झाली. सुमारे २0 मिनिटे दोघांमध्ये खडाजंगी चालली होती. अंगावर धावून जाण्याचा प्रकार तेवढा राहिला होता.
करंबळी ग्रामपंचायतीने ४ टक्क्यांनी विकासनिधीतून कर्ज घेऊन सांस्कृतिक सभागृह बांधले आहे. हे सभागृह बँकेसाठी भाड्याने देण्यासाठीच्या रीतसर प्रस्तावाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. मात्र, यानंतर ३0 जानेवारीच्या स्थायी समितीतील चर्चेचा संदर्भ देत ही जागा बँकेला देता येणार नसल्याचे जिल्हा परिषदेने कळवले आहे.या विषयावर सतीश पाटील यांनी घाटगे यांना जाब विचारला. कर्ज काढून इमारत बांधल्यानंतर उत्पन्न मिळत असताना, रीतसर परवानगीमिळाली असताना पुन्हा ग्रामपंचायतीची परवानगी रदद का करता असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.यावर घाटगे यांनी संतप्त होत पाटील यांच्यावर टीका करायला सुरूवात केली. या दोघांनीही एकमेकांवर आरोप सुरू केले. कशी परवानगी नाकारता ते बघतोच असे आव्हान पाटील यांनी घाटगे यांना दिले. तर परवानगी कशी मिळते ते मी बघतो असे प्रतिआव्हान घाटगे यांनी दिले.
अखेर अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी मध्यस्थी करत आपण तिघेही बसून या प्रश्नावर चर्चा करू असे सांगून हा विषय थांबवला.

मोरेंचा घरचा आहेर
मोरे यांनी अर्थसंकल्पावर स्पष्ट शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्यांना बोलताना बसवण्याचा प्रयत्न झाल्यावर सर्व विषय समजून घेण्याचा सदस्यांचा हक्क आहे. आम्हाला गृहीत धरून चालणार असाल, तर तो आमचा अपमान आहे. सत्तेत असलेल्या मोरे यांच्या या वाक्यानंतर दोन्ही काँगे्रसच्या सदस्यांनी टाळ्या वाजवल्या, तर सतीश पाटील यांनी मोरे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी केली.

अभ्यास दौऱ्यांना चाप
या अर्थसंकल्पामध्ये महिला आणि बालकल्याण समिती वगळता अन्य विभागांच्या अभ्यासदौऱ्यांना चाप लावण्यात आला आहे. या दौºयांसाठी कोणतीही तरतूद नव्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही. यावर प्रा. शिवाजी मोरे यांनी नाराजी व्यक्त करत निधी लावण्याची मागणी केली.

 

अरुण इंगवले : अंथरुण पाहून पाय पसरणारा असा हा अर्थसंकल्प आहे.
प्रा. शिवाजी मोरे : अर्थसंकल्पामध्ये म्हणावी तशी वाढ नाही. गेल्या वर्षीचाच अर्थसंकल्प मांडल्यासारखे वाटते. सदस्यांना अधिक निधी मिळणे आवश्यक होते.
राजवर्धन निंबाळकर : अंगणवाड्यांसाठी शुद्ध पाणी योजना देण्यासाठी २0 लाखांची तरतूद जास्त वाटते.

डॉ. पद्माराणी पाटील : मुळात आमच्या मागणीपेक्षा ही तरतूद अपुरी आहे.
प्रसाद खोबरे : शालेय शिक्षण समितीला
पुरस्कार सुरू करा.
प्रवीण यादव : पेठवडगाव येथील पशूवैद्यकीय दवाखान्यांभोवतालचे अतिक्रमण काढून
गाळे बांधा.
विजय बोरगे : कुस्तीसाठी मॅट दिल्याबद्दल अभिनंदन.
पांडुरंग भांदिगरे : कबड्डीसाठीही मॅट द्या.
अ‍ॅड. हेमंत कोलेकर : मानव विकास निर्देशांका -मध्ये वृद्धी होण्यासाठीच्या योजना आवश्यक.


 


 

Web Title:  Rs. 38 crores budget for Kolhapur Zilla Parishad: Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.