मित्राला ४४ लाखांचा गंडा
By admin | Published: November 11, 2015 12:45 AM2015-11-11T00:45:25+5:302015-11-12T00:25:27+5:30
दामदुपटीचे आमिष : पेडणेकर दाम्पत्यासह तिघांना अटक
कोल्हापूर : परदेशी ट्रेडिंग शेअर्समध्ये पैशांची गुंतवणूक करा, तुम्हाला दोन वर्षांमध्ये दुप्पट रक्कम मिळेल, असे सांगून मित्राची सुमारे ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी पेडणेकर दाम्पत्यासह तिघांना अटक केली.
संशयित आरोपी अमोल मनोहर पेडणेकर (वय ३०) त्यांची पत्नी विजया (२३), नातेवाईक संजय अरविंद वेसणेकर (४९, सर्व रा. फायर स्टेशननजीक, फुलेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. संशयित आशिष मनोहर पेडणेकर जर्मनीमध्ये असून, त्याला अद्याप अटक केलेली नाही. याप्रकरणी अभय प्रभाकर जाधव (४५, रा. सुश्रुषानगर, देवकर पाणंद) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अभय जाधव बांधकाम क्षेत्रात नोकरीस आहेत. अमोल पेडणेकर हा त्यांचा मित्र आहे. यातून अमोल याने भाऊ आशिष हा जर्मनी येथे नोकरी करतो, असे सांगून जाधव यांच्याकडून परदेशी ट्रेडिंग शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक करा. तुम्हाला दोन वर्षांमध्ये दुप्पट रक्कम मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चौघा संशयितांनी संगनमताने जाधव यांच्याकडून गेल्या तीन वर्षांत दुप्पट पैशांचे आमिष दाखवून धनादेश व रोखीने सुमारे ४३ लाख ७८ हजार रुपये घेतले. दोन वर्षांची मुदत संपल्यानंतर जाधव यांनी पैशांची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर मूळ रकमेची मागणी करूनही त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अमोल पेडणेकर व संजय वेसणेकर हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. (प्रतिनिधी)