बटकणंगलेच्या पाझर तलावाला ४४ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:17+5:302021-03-28T04:23:17+5:30
गडहिंग्लज : बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथे नवीन पाझर तलाव बांधण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून ४४ लाखांचा निधी मंजूर झाला. ...
गडहिंग्लज : बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथे नवीन पाझर तलाव बांधण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून ४४ लाखांचा निधी मंजूर झाला. त्याची निविदाही निघाली असून, या तलावामुळे गावचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मे २०१८ मध्ये काही तरुण कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्थानिक जल फौंडेशनच्या माध्यमातून गावापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरीच्या डोंगरावरून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी जिरविण्यासाठी श्रमदानातून चरखुदाई केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये नाम फौंडेशननेदेखील यासाठी मदत केली. त्यामुळे लोकसहभागातून सुमारे २५ लाखांचे काम झाले.
दरम्यान, पाण्यासाठी धडपडणारे गाव म्हणून शासनाने जलयुक्त शिवार योजनेत बटकणंगलेचा समावेश केला. त्यातूनच हा तलाव बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. गावालगतच्या तारओहळला पुरेसे पाणी नसल्यामुळे व गावाजवळून कोणतीही नदी वाहत नसल्यामुळे दरवर्षी गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने एकमताने त्याला मान्यता दिली.
जलसंधारण विभागातर्फे काढण्यात आलेली ही निविदा १ एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहे. याकामी आमदार राजेश पाटील, जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
* गोठणावर होणार तलाव
बटकणंगले येथील गोठण नावाच्या गायरानातील सुमारे अडीच एकर जागेवर हा तलाव बांधण्यात येणार आहे. गावालगतच्या भैरीच्या डोंगरावरून पावसाळ्यात वाहून वाया जाणारे पाणी या तलावामध्ये साठविण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील गुरा-ढोरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार असून, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे.