साखर निर्यातीला प्रतिटन ६ हजार रुपये अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:54+5:302020-12-17T04:47:54+5:30
नवी दिल्ली : ऊस उत्पादकांची थकबाकी देण्यासाठी कारखान्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने बुधवारी साखर निर्यात अनुदान योजनेची घोषणा ...
नवी दिल्ली : ऊस उत्पादकांची थकबाकी देण्यासाठी कारखान्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने बुधवारी साखर निर्यात अनुदान योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार साठ लाख टन साखरेच्या निर्यातीवर प्रतिटन सहा हजार रुपये याप्रमाणे साडेतीन हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत ६० लाख टन साखर निर्यात अनुदान योजनेला मंजुरी देण्यात आली असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
सन २०१९-२० या हंगामात हेच अनुदान प्रतिटन १०,४४८ रुपये होते. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर थोडेफार वधारले असल्याने निर्यात अनुदानाची रक्कम प्रतिटन सहा हजार रुपये करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होत आहे. यंदाही ते ३१० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. देशाची गरज २६० लाख टनांची आहे.
चौकट
पाच कोटी ऊस ऊत्पादकांना होणार लाभ
केंद्राच्या या निर्णयाचा फायदा देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि पाच लाख साखर कारखान्यांचे कर्मचारी यांना होणार आहे