आबिटकरांच्या सूतगिरणीसाठी ६३ कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:22 AM2021-04-15T04:22:34+5:302021-04-15T04:22:34+5:30

समीर देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आमदार प्रकाश आबिटकर हे राधानगरीत उभारत असलेल्या सूतगिरणीसाठी महाराष्ट्र शासनाने ६३ कोटी ...

Rs 63 crore sanctioned for Abitkar spinning mill | आबिटकरांच्या सूतगिरणीसाठी ६३ कोटी रुपये मंजूर

आबिटकरांच्या सूतगिरणीसाठी ६३ कोटी रुपये मंजूर

Next

समीर देशपांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : आमदार प्रकाश आबिटकर हे राधानगरीत उभारत असलेल्या सूतगिरणीसाठी महाराष्ट्र शासनाने ६३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ‘गोकुळ’च्या धामधुमीत आबिटकर यांनी मुंबईत ठिय्या मारून ३१ मार्चला ही मंजुरी घेतली आहे. एवढेच नव्हे, तर ‘गोकुळ’ला विरोधी आघाडीला पाठिंबा देतानाच मतदारसंघातील विकासकामांसाठी भरभक्कम निधी आणि जिल्हा बँकेच्या उमेदवारीचाही शब्द घेतला आहे.

कोणतीही मोठी राजकीय शक्ती उघडपणे सोबत नसताना आबिटकर यांनी दीड वर्षांपूर्वीच्या विधानसभेत दुसऱ्यांदा बाजी मारली. परंतु, आपल्याकडे मोठी सहकारी संस्था नसल्याचे शल्य आबिटकर यांना होते. १९९३ ला सदाशिवराव मंडलिक यांनी सूतगिरणीचा प्रस्ताव तयार केला होता; परंतु त्याचा नंतरच्या काळात पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे नंतरच्या काळात माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही सूतगिरणीचा अर्धवट प्रस्ताव घेऊन तो पुढे रेटण्याचा प्रयत्न केला; परंतु तो देखील पूर्ण होऊ शकला नाही.

हाच प्रस्ताव आबिटकर यांनी आपल्याकडे घेऊन गेली दोन वर्षे त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहापैकी केवळ आबिटकर विजयी झाल्याने त्यांनी शब्द टाकून ३१ मार्च २०२१ ला आपली सूतगिरणी मंजूर करून घेतली आहे. यासाठी त्यांनी ‘गोकुळ’ची धामधूम सोडून पंधरा दिवस मुंबई गाठली होती.

चौकट

मतदारसंघ मजबुतीसाठी पावले

‘गोकुळ’ निवडणुकीत पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक यांच्या उलट भूमिका घेणे आबिटकर यांच्यासाठी तुलनेत अवघड होते. कारण पी. एन. यांच्या राधानगरीतील गटाचे नेहमी आबिटकर यांना पाठबळ मिळाले होते. म्हणून एकीकडे सत्तेत असलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनाही दुखवायचे नाही अशा कात्रीत आबिटकर सापडले होते. परंतु, त्यांनी या दोघांकडून मतदारसंघातील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी ६० कोटींहून अधिक निधीसाठी शब्द घेतला आहे. कारण जर राधानगरीतून पी. एन. समर्थक आपल्या बाजुने राहणार नसतील, तर किमान विकासकामांच्या माध्यमातून मतदार तयार करण्याचे आबिटकर यांचे प्रयत्न आहेत.

चौकट

अर्जुन आबिटकर पतसंस्था गटातून

सध्या जिल्हा बँकेत भाजपचे अनिल पाटील हे पतसंस्था गटातून कार्यरत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या गटातून सत्तारूढ आघाडीकडून आमदार आबिटकर यांचे बंधू प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या नावाची चर्चा ‘गोकुळ’च्या तडजोडीवेळी झाल्याचे सांगण्यात आले.

चौकट

सूतगिरणी राधानगरीत उभारणार

राधानगरी तालुक्यात मोठे औद्योगिक किंवा सहकारी प्रकल्प नसल्याने आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यात ही सूतगिरणी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने जागा उपलब्ध करून देण्याविषयी त्यांनी ‘गोकुळ’ च्या धामधुमीतच दोन्ही मंत्र्यांकडून शब्द घेतल्याची चर्चा आहे.

Web Title: Rs 63 crore sanctioned for Abitkar spinning mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.