Kolhapur: काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 11:41 AM2023-10-21T11:41:57+5:302023-10-21T11:42:12+5:30

धरणाला सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

Rs 80 crore sanctioned for clearing the leakage of Kalammawadi dam | Kolhapur: काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर

Kolhapur: काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित क्रांतीची वरदायीनी असलेले काळम्मावाडी धरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अस्मिता जणू. या धरणाला सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मान्यतेवर सही केली आहे. या निधीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

काळम्मावाडी धरणाची साठवण क्षमता २५.४० टीएमसी आहे. परंतु मोठ्या प्रमाणात लागलेल्या गळतींमुळे तो साठा १९.६८ टीएमसी इतका कमी ठेवावा लागायचा. या धरणातून प्रत्येक सेकंदाला साडेतीनशे लिटर हिशोबाने दररोज तीन कोटी लिटर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी गळत्यांमधून वाया जात असे. मोठ्या प्रमाणातील गळत्यांमुळे धरणाच्या बांधावर दाब येऊ नये म्हणून पाणी सोडून दिल्यामुळे धरणात फक्त सहा टीएमसी इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या नद्या आणि कालव्यांच्या भिज अक्षरशः दुष्काळासारखी परिस्थिती जाणवली. शेतीच्या पाणीटंचाईसह पिण्याच्या पाणीटंचाईलाही जिल्ह्याला तोंड द्यावे लागले.

येत्या पावसाळ्यापर्यंत गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्यास येत्या पावसाळ्यापासून पूर्ण म्हणजे २५. ४० टीएमसी इतक्या क्षमतेने पाणीसाठा राहील. त्यामुळे साहजिकच शेतीसह पिण्यासाठीही मुबलक पाणी उपलब्ध होईल. तसेच; कोल्हापूर शहरासाठी दिवाळीपासून सुरू होत असलेल्या थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा २४ तास होईल.

Web Title: Rs 80 crore sanctioned for clearing the leakage of Kalammawadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.