500 रु. भरा; हिंडलगामध्ये कैद्यासारखे राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:29 AM2021-08-19T04:29:40+5:302021-08-19T04:29:40+5:30

बेळगाव दि.18 : तुम्हाला कारागृहातील कैद्याचे जीवन अनुभवायचे आहे, तर मग चला प्रतिदिन 500 रुपये भरा आणि कोणत्याही त्रासाविना, ...

Rs.500 Fill; Stay like a prisoner in Hindalga | 500 रु. भरा; हिंडलगामध्ये कैद्यासारखे राहा

500 रु. भरा; हिंडलगामध्ये कैद्यासारखे राहा

googlenewsNext

बेळगाव दि.18 :

तुम्हाला कारागृहातील कैद्याचे जीवन अनुभवायचे आहे, तर मग चला प्रतिदिन 500 रुपये भरा आणि कोणत्याही त्रासाविना, कोर्टाच्या तारखा, विनाकैद्याचे जीवन अनुभवा. बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने सर्वसामान्य लोकांना 24 तासांसाठी 500 रुपयांत कैद्याचे जीवन अनुभवता यावे यासाठी ‘कैद्याच्या जीवनातील एक दिवस’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला असून, तिच्या मंजुरीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.

‘कैद्याच्या जीवनातील एक दिवस’ या संकल्पनेंतर्गत हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट देणाऱ्या पर्यटकांना खऱ्या कैद्यांप्रमाणे वागणूक दिली जाईल. कैद्यांच्या दैनंदिन जीवनाप्रमाणे पहाटे 5 वाजता त्यांना उठविले जाईल. सर्वांत रोमहर्षक म्हणजे दिवसभर त्यांना कैदी नंबरसह कैद्याच्या पोशाखात वावरावे लागेल. कारागृहाच्या कोठडीत राहण्याची व्यवस्था करून त्यांना कैद्याप्रमाणे जेवण दिले जाईल, तसेच कारागृहातील कैद्यांसमवेत त्यांना तेथील माळीकाम, जेवण तयार करणे, आवार झाडलोट करणे आदी कामे करण्याची संधी मिळेल.

कारागृहाचे सुरक्षा रक्षक पर्यटकांना पहाटे 5 वाजता उठवतील. त्यानंतर सकाळचा चहा घेण्यापूर्वी त्यांना आपल्या कोठडीची स्वच्छता म्हणजे झाडलोट करावी लागेल. त्यानंतर तासाभराने सकाळचा नाश्ता दिला जाईल. पर्यटकांना सकाळी 11 वाजता भात आणि सांबार दुपारच्या जेवणाच्या स्वरूपात दिले जाईल. त्यानंतरचे जेवण सायंकाळी 7 वाजता देण्यात येईल. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कैद्यांना मांसाहारी भोजन पुरविले जाईल. पर्यटकांनी जर आठवड्याअखेर कारागृहातील कैद्यांसमवेत राहणे पसंत केले, तर त्यांना खास सुग्रास भोजन पुरविले जाईल, असे कारागृहाच्या सूत्रांनी सांगितले.

सर्व कामे झाल्यानंतर कारागृहातील कैद्यांप्रमाणे अस्सलपणा जाणवावा यासाठी पर्यटकांना चटई घेऊन जमिनीवर इतरांशेजारी झोपावे लागेल. त्यांना प्रत्यक्षात कोठडीत डांबून टाळे लावले जाईल. सदर कारागृहात पर्यटकांना भयानक गुन्हेगारांसोबतदेखील वावरण्याची संधी दिली जाईल. सध्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात 29 घातक कैदी डांबलेले आहेत. यामध्ये सामूहिक हत्येचा आरोप असणाऱ्या चंदन तस्कर विरप्पणचे साथीदार, कुख्यात दंडूपल्ल्या गँगचे सदस्य, सिरियल किलर व बलात्कारी उमेश रेड्डी आदींचा समावेश आहे. सर्वसामान्य नागरिकांना कारागृहातील कैद्यांच्या जीवनाबाबत माहिती व्हावी आणि लोकांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करता यावे, हा या संकल्पनेमागचा मूळ उद्देश आहे.

Web Title: Rs.500 Fill; Stay like a prisoner in Hindalga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.