‘आरएसएस’ची विचारधारा देशासाठी घातक
By Admin | Published: February 6, 2016 12:39 AM2016-02-06T00:39:17+5:302016-02-06T00:39:27+5:30
अमरिंदरसिंग राजा ब्रार : नथुराम गोडसेचे मंदिर होऊ देणार नाही, युवक काँँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा
कोल्हापूर : भाजपचे सरकार ‘आरएसएस’ची विचारधारा देशातील जनतेवर लादण्याचे काम करीत आहे. ती लागू झाल्यास देशाचे तुकडे होऊन जातीय दंगली होतील, अशी चिंता अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अमरींदर सिंग राजा ब्रार यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. याला रोखण्यासाठी युवक कॉँग्रेसने सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉल येथे युवक कॉँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, प्रदेश प्रभारी हिंमतसिंग, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, राहुल वर्धा, धृवी लकडे, सत्यजित देशमुख, राहुल आवाडे, जिल्हाध्यक्ष शंभुराजे देसाई, जयराज पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ब्रार म्हणाले, कॉँग्रेसने काही काम केले नाही, असा डांगोरा पिटत भाजप सत्तेवर आले; परंतु त्यांनी सत्तेवर आल्यानंतर दीड वर्षात कुणासाठीच काही केले नाही. सध्या भाजप सरकारविरोधी वातावरण आहे; त्यामुळे साडेतीन वर्षांनंतर पुन्हा पूर्ण बहुमताने कॉँग्रेसचे सरकार येईल. देशात सध्याचे सरकार ‘आरएसएस’ची विचारधारा लादण्याचे काम करीत आहे. ही विचारधारा देशाचे तुकडे करणारी आहे. त्यामुळे तिच्या विरोधासाठी युवक कॉँग्रेसला सज्ज राहावे लागेल. या सरकारच्या माध्यमातून नथुराम गोडसे याचे मंदिर बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो प्रयत्न युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून हाणून पाडूया.
ते पुढे म्हणाले, सोनिया गांधींसह त्यांच्या संपूर्ण परिवारावर खटला चालवून त्यांना संपविण्याचे षड्यंत्र या सरकारकडून सुरू आहे; कारण त्यांना संपविले की पूर्ण पक्षच संपेल व ‘आरएसएस’ची विचारधारा लादता येऊ शकेल, असे त्यांना वाटते.
विश्वजित कदम म्हणाले, भाजप सरकारने देशभर कॉँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर सुडाचे राजकारण सुरू ठेवले आहे. त्यांना जनता कदापिही माफ करणार नाही. हे सरकार चुकून आपल्यातीलच काही लोकांनी निवडून दिले आहे. या सरकारने दिलेली कोणतीही वचने पाळलेली नाहीत.
आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप व मित्रपक्षांच्या सरकारमध्ये सुसंवाद नाही. त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चित्र बदलणार आहे. यासाठी पुढील काळात युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघर्षाची भूमिका ठेवली पाहिजे. सरकारविरोधात भ्रष्टाचार, गैरकारभार यांसह अनेक मुद्दे आहेत. ही संधी समजून कार्यकर्त्यांनी आंदोलने करावीत.
पी. एन. पाटील म्हणाले, ब्रिटिशांची सत्ता उलथवून लावतेवेळी भाजपचा जन्मही झाला नव्हता. यावेळी कॉँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तुरुंगवास भोगला. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी साखर उद्योगात क्रांती केली. अन्नसुरक्षेसारखी योजना बंद करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनाच फक्त ‘अच्छे दिन’ आले आहेत.
प्रकाश आवाडे म्हणाले, जिल्हा परिषद व नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये येणाऱ्या विधानसभेची रंगीत तालीम असे समजूनच ताकदीने उतरावे. यावेळी ऋतुराज पाटील, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, सरला पाटील, अमर देसाई, आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
हे सरकार सुटबूटवाल्यांचे
भाजप सरकार हे गरीब व शेतकऱ्यांचे नसून ते सुटबूटवाल्या श्रीमंतांचे आहे. त्यांच्याकडून लोकहिताचे कोणतेही निर्णय आतापर्यंत झालेले नाहीत. उलट कॉँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या या सरकारच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झाले असून, त्यामध्ये मंत्री अडकले आहेत, असा आरोप अमरींदरसिंग राजा ब्रार यांनी केला.
इमानदारीने काम करा, न्याय मिळेल
स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. हसत-हसत फाशीचा दोर कवटाळला; परंतु आता तेवढे करण्याची गरज नाही. जनतेच्या प्रश्नांवर इमानदारीने लढा. तुम्हाला योग्य न्याय मिळेल. मनात पाप ठेवल्यास काहीच साध्य होणार नाही, असे आवाहन ब्रार यांनी युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले.