‘आरएसएस’ने आंबेडकरांवर बोलणे योग्य नाही
By admin | Published: April 16, 2016 12:33 AM2016-04-16T00:33:29+5:302016-04-16T00:43:13+5:30
डोनथा प्रशांश : बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्तजयंती कार्यक्रमांतर्गत प्रेरणा सभा
कोल्हापूर : ज्यांचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आहेत त्या ‘आरएसएस’ने आंबेडकरांवर बोलणे योग्य नाही, असे प्रतिपादन रोहित वेमुलाचा सहकारी व हैद्रराबाद केंद्रीय विद्यापीठाचा विद्यार्थी डोनथा प्रशांश यांनी शुक्रवारी येथे केले. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या हत्येतून ब्राह्मण्यवाद दिसत आहे. त्याला विरोधात आपली लढाई आहे; परंतु ही लढाई लढणाऱ्यांनाच देशद्रोही ठरविले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी व महात्मा जोतिबा फुले यांची १८९ व्या संयुक्तजयंती कार्यक्रमांतर्गत शाहू स्मारक भवन येथे प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर, डॉ. ज. रा. दाभोळे, नंदकुमार गोंधळी, डॉ. सुनील पाटील, मच्छिंद्र कांबळे, संदीप संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
डोनथा प्रशांश म्हणाले, ‘आरएसएस’ची विचार प्रणाली ही डॉ. आंबेडकर यांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे त्यांनी आंबेडकरांवर बोलणे योग्य नाही. त्यांनी आंबेडकरांचे विचार समजून घेतल्यास ‘आरएसएस’ संपून जाईल. सध्या भारतावर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कारवायांसंदर्भात बोलले जात आहे; परंतु दलित, मुस्लिम, ओबीसी यांच्यावर सुरूअसलेल्या अत्याचारावर बोलताना कोण दिसत नाही.
डॉ. आंबेडकरांना आर्थिक व मानसिक आधार देण्याचे काम राजर्षी शाहू महाराज यांनी केले आहे. त्यामुळे ते आमचे प्रेरणास्रोत आहेत. सध्या जातीयवाद घट्ट होताना दिसत आहे. गावामध्ये असणारी जातीयता आता विद्यापीठांमध्येही आली आहे. या जातीयतेचा रोहित वेमुला बळी ठरला आहे. तो ब्राह्मण्यवादाचा बळी असून, या संदर्भात ब्राम्हणांविरोधात आवाज उठविला पाहिजे. सध्या हा ब्राम्हणवाद ‘आरएसएस’च्या माध्यमातून सुरूआहे. गावातील व विद्यापीठातील अत्याचार हे त्याचे द्योतक आहे. बाबासाहेबांचा हिंदूराष्ट्राला विरोध होता, तोच विचार आपण पुढे नेऊया.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, पानसरे-दाभोलकर यांच्या हत्येचा सूत्रधार रुद्र पाटील याचा पोलिसांनी शोध घेण्यासाठी मे महिन्यापर्यंत मुदत देत आहे. या कालावधीत जर पोलिसांनी रुद्र पाटीलला शोधून काढले नाही तर आम्हीच त्याचा शोध घेऊ.
ज. रा. दाभोळे म्हणाले, इचलकरंजी येथील कांबळे नावाची युवती सनातन संस्थेकडे कशी वळली? याचा शोध घेणे गरजेचे आहे. असे करण्यामागे तिचे कोणते दु:ख होते हे ही समजून घेतले पाहिजे.
येथील शाहू स्मारक भवनात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमांतर्गत प्रेरणा सभेला पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते. अनिल म्हमाणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनील पाटील यांनी स्वागत केले. मच्छिंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
मोदी, ठाकरे, अडवाणींसारखे नेते नकोत
सांप्रदायिकतेवर देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या ठाकरे, मोदी व अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांऐवजी आम्हाला सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, अय्यपन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांची आवश्यकता असल्याचे प्रशांश यांनी सांगितले.