बावड्यात आरएसएसचे संचलन
By admin | Published: October 13, 2016 01:47 AM2016-10-13T01:47:51+5:302016-10-13T02:09:05+5:30
३५० स्वयंसेवकांची उपस्थिती : चंद्रकांतदादा पाटील यांचा सहभाग
कोल्हापूर/कसबा बावडा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथेप्रमाणे दसऱ्यानिमित्त मंगळवारी सकाळी संचलन करण्यात आले. कसबा बावडा परिसरात हातात दंड घेऊन झालेले संचलन औत्सुक्याचा विषय ठरले. राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेदेखील या संचलनामध्ये सहभागी झाले होते.
पॅव्हेलियन मैदानावर सर्व स्वयंसेवक एकत्र आले. यानंतर भगवा ध्वज लावण्यात आला. प्रार्थनेनंतर संचलनाला सुरुवात झाली. ड्रम, ढोल, बासरी आणि बिगुलाच्या घोषामध्ये खांद्यावर दंड घेऊन स्वयंसेवक संचलनामध्ये सहभागी झाले होते. ठिकठिकाणी स्वागतासाठी रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. तसेच स्वयंसेवक व भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. अनेक ठिकाणी फटाकेही फोडण्यात आले.
बलभीम गल्ली, रणदिवे गल्ली, चौगुले गल्ली, लाईन बझार, नवीन न्यायसंकुलासमोरून पुन्हा पॅव्हेलियन मैदानावर या संचलनाचा समारोप झाला. शहर संघटक डॉ. सुकिरण वाघ, विभाग संघचालक आप्पा दड्डीकर, विभाग कार्यकारिणी सदस्य भाई येसणे, जिल्हा कार्यवाह केदार जोशी यांच्यासह सुमारे ३५० स्वयंसेवक संचलनामध्ये सहभागी झाले होते. (प्रतिनिधी )
हाफ पँटमधून फुल्ल पँट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे खाकी हाफ पॅँट, पांढरा शर्ट आणि डोक्यावर काळी टोपी असा स्वयंसेवकाचा पेहराव डोळ्यांसमोर येतो. यंदा प्रथमच हाफ पॅँटमधून फुल्ल पॅँटमध्ये येण्याचा निर्णय संघाने घेतल्याने फुल्ल पॅँट घातलेले स्वयंसेवक या संचलनामध्ये सहभागी झाले होते.
स्वयंसेवक चंद्रकांतदादा
राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील गणवेशामध्ये या संचलनामध्ये सहभागी झाले होते. एक स्वयंसेवक या नात्याने चंद्रकांतदादांनी संचलनामध्ये सहभाग घेतला. चंद्रकांतदादा या गणवेशामध्ये कसबा बावडा परिसरातून संचलन करीत असताना नागरिकांना याचे मोठे औत्सुक्य असल्याचे जाणवले.
दसऱ्यानिमित्त कसबा बावडा परिसरातून मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संचलन करण्यात आले. यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेदेखील सहभागी झाले होते.