आरटीओकडे ६३० कोटींचा महसूल वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:19+5:302021-04-09T04:24:19+5:30
मागील वर्षी नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस जगभरात कोरोनाचा कहर वाढला. भारतातही केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांत ...
मागील वर्षी नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस जगभरात कोरोनाचा कहर वाढला. भारतातही केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांत सर्व व्यवसाय पूर्णपणे ठप्प होते. त्यात वाहन व्यवसायाचाही समावेश होता. वाहन खरेदी - विक्री आणि वाहनांची रस्त्यावरील रेलचेल बंद झाली. त्यामुळे प्रादेशिक परिवहनकडे न कोणत्या वाहनाची नोंद, ना कर भरणा, ना थकीत कराची वसुली असा कोणताच व्यवहार झाला नाही. पर्यायाने महसुलात घट झाली. सर्वसाधारणपणे जुलै महिन्यानंतर वाहन व्यवहार सुरू झाले. त्यानंतर माल वाहतूकदार, रिक्षाचालक, खासगी वाहन खरेदी करणारे तसेच वाहन परवाना नूतनीकरण, थकीत कर, पासिंग, पंधरा वर्षांवरील मुदतबाह्य वाहनांचे नूतनीकरण असा कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अंतर्गत कोल्हापूर, कागल, चंदगड तपासणी नाका, सांगली, सातारा, कऱ्हाड या कार्यालयांकडून तब्बल ६२९.६३ कोटी इतका महसूल जमा करण्यात यश आले. परिवहन आयुक्त कार्यालयाने ४२० कोटी ६६ लाख २० हजारांचे उद्दिष्ट दिले होते. कार्यालयाने उद्दिष्टापेक्षा जादा महसूल जमा केला.
सन २०१९-२० या मागील आर्थिक वर्षात याच विभागातून ५७४.७० कोटी इतका महसूल जमा झाला होता. यंदा त्यात ५४.९० कोटी इतकी वसुली जादा झाली.
असा जमा महसूल ( कोटी)
कोल्हापूर - २६८.९८
कागल - १७.५०
चंदगड - ५७ लाख
सांगली - १६३.२१
सातारा - १३५.६०
कऱ्हाड - ४५.७७
एकूण - ६२९.६३ कोटी
कोट
मागील लॉकडाऊननंतर थकीत कर, पासिंग, वाहन परवाना नवीन नोंदणी, नवी जुनी वाहन नोंदणी, नूतनीकरण आणि १५ वर्षांवरील मुदतबाह्य वाहनांची पुन्हा नोंदणी व बी.एस ६ नोंदणी यातून हा उद्दिष्टपेक्षा जादा महसूल गोळा करू शकलो.
डॉ. स्टीव्हन अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी कोल्हापूर