एमएच-सीईटी परिक्षेमुळे ‘आरटीओ’ बेहाल
By admin | Published: May 11, 2017 05:48 PM2017-05-11T17:48:20+5:302017-05-11T17:48:20+5:30
८० कर्मचारी परिक्षेच्या कर्तव्यावर ; कामकाज अंशत: सुरु
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश (एमएच-सीईटी) परिक्षेसाठी राज्य शासनाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज अक्षरश: कोलमडले आहे . अशा पद्धतीने कामकाज बंद करुन परिक्षेसाठी जुंपल्याने नागरीकांची कामे खोळंबल्याने अनेक वाहनधारकांनी या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
शहरातील अनेक उपकेंद्रांवर शनिवारी (दि. ६), मंगळवारी (दि.९) गुरुवारी (दि. ११) असे तीन दिवस जिल्हा प्रशासनाने परीक्षेचे नियोजन केले होते. यासाठी महसूल व अन्य विभागांतील सुमारे एक हजाराहून अधिक अधिकारी, कर्मचारी या कामासाठी नियुक्त केले होते. त्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ५ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी व ७५ अन्य कर्मचारी असे ८० जणांचा समावेश होता. या तीन दिवसांत प्रादेशिक परिवहनमधील कामकाज अशंत: बंद असल्याचे बाहेर फलकावर लिहले होते. प्रत्यक्षात वाहन चालविण्याचा परवाना चाचणी वगळता अन्य विभाग बंद असल्याचे चित्र गुरुवारी दिसत होते. त्यात काही खिडक्यांसमोर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी उपस्थित होते. अशा स्थितीमुळे तीन दिवसांचा महसुल बुडाला. त्याशिवाय वाहनांच्या कामासाठी आलेल्या वाहनधारकांना कामकाज न झाल्याने हेलपाटे झाले.
एका विभागाचे काम बंद पाडून परिक्षेसाठी कर्मचारी नियुुक्त कसे केले जातात. असा सवाल कामासाठी आलेल्या वाहनधारकातून विचारला जात होता. विशेष म्हणजे अशा परिक्षा महत्वाच्या असल्या तरी त्याचे नियोजन सुट्टीच्या दिवशी केले जाते. यंदा मात्र, हे काम कार्यालयीन कामकाज वेळेत करावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.