हुल्लडबाजीने लग्न समारंभातील पवित्रता हरवतेय

By Admin | Published: March 18, 2015 09:57 PM2015-03-18T21:57:47+5:302015-03-18T23:57:28+5:30

ज्येष्ठ मंडळींतून नाराजीचा सूर : अक्षता, स्प्रेचा वधू-वरासह भटजींवर मारा

The ruckus can defeat the purity of the wedding ceremony | हुल्लडबाजीने लग्न समारंभातील पवित्रता हरवतेय

हुल्लडबाजीने लग्न समारंभातील पवित्रता हरवतेय

googlenewsNext

संजय पाटील - सरूड वधू-वरांना साताजन्माचे जोडीदार बनण्याचा कार्यक्रम म्हणजे लग्न समारंभ. नववधू-वर या समारंभात लग्नाच्या बेडीत अडकून जन्मभर एकमेकांचे सहचारी बनतात. लग्न समारंभातील हळदीपासून ते वराती पर्यंतचा प्रत्येक क्षण हा मंगलमय व पवित्र; मात्र हल्लीच्या आधुनिक जमान्यात अनेक लग्न समारंभात युवकांकडून लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात होणाऱ्या हुल्लडबाजीच्या कृत्यांनी हे पवित्र क्षण पायदळी तुडवले जाऊन लग्नाचा खेळ होत आहे. भटजी व नवरदेवावर उत्साही युवकांकडून अक्षतांचा अक्षरश: मारा होतो. या प्रकारामुळे बुजूर्ग मंडळींतून नाराजी व्यक्त होत आहे.
प्रत्येकाच्या जीवनात लग्न समारंभ म्हणजे लाखमोलाचा क्षण. प्रत्येक पवित्र क्षणांनी नवरी-नवऱ्याला मिळत असते, ते दोघेही एकमेकांचा स्वीकार उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने करत असतात. पूर्वी एका दिवसापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या समारंभात किती गोड आणि मंगलमय प्रसन्न व पवित्र वातावरण असायचे; पण सध्याच्या काळात लग्न समारंभातील पवित्र हरवायला लागले आहे.
सध्या सर्रास लग्न समारंभात हुल्लडबाजीचे प्रकार पाहावयास मिळत आहे. ज्या क्षणांनी वधू-वरांची लग्नगाठ बांधली जाते, त्या क्षणांच्या वेळीच युवकांकडून (वरदावळे) अशोभनीय वर्तन होताना दिसत आहे.


१ मंगलाष्टका सुरू असतानाच अधूनमधून भटजी व नवरदेवावर अक्षतांचा मारा केला जातो. शेवटची मंगलाष्टका संपल्यावर उडविले जाणारे सुगंधी द्रव्याच्या (स्प्रे)वेळी भटजीला ‘टार्गेट’ केले जाते. शेवटी या स्प्रे-पासून बचाव करण्यासाठी भटजीला पवित्र आंतरपाटाचा आधार घ्यावा लागत आहे. काही भटजींना तर शेवटची अक्षता संपली की ताबडतोब लग्नाच्या व्यासपीठावरुन काही क्षणासाठी बाजूला पळ काढावा लागत आहे.


२ अक्षता संपल्यानंतर नव वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालून एकमेकांचे जन्माचे जोडीदार म्हणून स्वीकार करतात. हार घालण्याच्या या कार्यक्रमाचा पुरता ‘खेळ’ झाला आहे. अनेक लग्नसमारंभात हार घालतेवेळी नवरी व नवऱ्याला उचलून घेऊन पवित्र हार एकमेकांच्या गळ्यात अक्षरश: फेकून घातले जात आहेत. नवरीच्या करवल्या व नवऱ्याचे वरदावळे यांच्याकडून अनेकवेळा अशोभनीय वर्तन होत आहे.


३ लग्नाचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे वरात. या कार्यक्रमाचा तर अलीकडच्या काळात ‘तमाशाच’ झाला आहे. एकंदरीत अलीकडे अनेक लग्नसमारंभात होणाऱ्या हुल्लडबाजीचे प्रकार पाहून जुनी-जाणती माणसे प्रचंड नाराजी व्यक्त करत असून युवकवर्गाने कार्यक्रमाचे महत्त्व जाणून आपले वर्तन योग्य ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: The ruckus can defeat the purity of the wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.