‘रुद्र’साठीही वकीलांची फौज उभारू

By admin | Published: September 25, 2015 12:18 AM2015-09-25T00:18:11+5:302015-09-25T00:26:12+5:30

संजीव पुनाळेकर : पापे लपविण्यासाठी ‘सनातन’वर बंदीची मागणी

For the 'Rudra', the army of the advocates | ‘रुद्र’साठीही वकीलांची फौज उभारू

‘रुद्र’साठीही वकीलांची फौज उभारू

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला संशयित समीर गायकवाड याला ‘बळीचा बकरा’ बनविला जात आहे. मडगाव (गोवा) बॉम्बस्फोटातील संशयित रुद्र पाटील यानेही न्यायालयात हजर व्हावे. त्याच्याही मागे वकिलांची फौज उभी करू, असे मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव पुनाळेकर यांनी गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड व शाम मानव यांच्यावर टीका करताना, ते आपली पापे लपविण्यासाठी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करीत असल्याचाही आरोप
अ‍ॅड. पुनाळेकर यांनी केला. सनातन संस्था आणि हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. कॉ. पानसरे हत्याप्रकरणी अटकेतील सनातन साधक, संशयित समीर गायकवाड याच्या बाजूने
अ‍ॅड. संजीव पुनाळेकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी वकीलपत्र घेतल्याने या पत्रकार परिषदेस विशेष महत्त्व होते.
अ‍ॅड. पुनाळेकर म्हणाले, माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ हे कोल्हापुरात बुद्धिभेद करीत आहेत; त्यामुळे ते सनातन संस्थेच्या मागे लागल्यास आम्हीही गप्प बसणार नाही. त्यांच्यावरही दहशतवादाचा गुन्हा नोंदवून त्यांना धडा शिकविणार आहोत, असेही ते म्हणाले.
पानसरे हत्याप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक होता. त्यामुळे त्याला निव्वळ संशयावरून कारवाई करून त्याचा नाहक बळी दिला जात आहे. याशिवाय रुद्रगौडा पाटील हाही सनातन संस्थेचा अर्धवेळ साधक होता; पण २०११ पासून न्यायालयाने त्याला मडगाव बॉम्बस्फोटामध्ये ‘फरार’ घोषित केल्यापासून तो आमच्या संपर्कात नाही; पण या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. तसेच दुसरा संशयित प्रवीण लिमकर हाही संपर्कात नाही. त्या दोघांचा संपर्क झाल्यास त्यांना न्यायालयापुढे हजर राहण्याचा मी निश्चितच सल्ला देईन, असेही
अ‍ॅड. पुनाळेकर यांनी सांगितले.
शमशुद्दीन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना, ते धार्मिक दहशतवाद पसरवीत असल्याने त्यांची जागा तुरुंगातच आहे. ते जर ‘सनातन’च्या मागे लागले तर आम्ही गप्प बसणार नाही; तसेच त्यांच्यावर दहशतवादाचा गुन्हा लवकरच नोंदविणार असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला. मुश्रीफ पोलीस सेवेत असताना त्यांनी केलेल्या कामांची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली.
...तर हेमंत करकरेंना जन्मठेप
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दिवंगत पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा दृश्य हात होता, असा आरोप करून ते म्हणाले, करकरे यांनी एका संशयिताला अटक न करताच त्याला खासगी विमानाने तपासासाठी फिरविले. त्याची ब्रेन मॅपिंग तपासणी केली. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. जर आज करकरे जिवंत असते तर ते जन्मठेपेच्या कारवाईस पात्र होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनीही सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, श्याम मानव यांच्या संस्थेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन कोटी रुपये दिले आहेत. त्या पैशांवर ते देशभर दौरे करीत आहेत; तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची सर्वांत जास्त बदनामी त्यांनीच केल्याने त्यांना दिलेले पैसे मुख्यमंत्र्यांनी परत घ्यावेत, अशीही त्यांनी मागणी केली.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रवरा प्रकल्पासाठी शासनाकडून दोन हजार कोटी रुपये उचलले होते, पण या प्रकल्पाचा दुष्काळग्रस्तांसाठी काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे या रकमेत शासनाची फसगत झाली आहे म्हणून शासनाने ही रक्कम वसूल करून दुष्काळग्रस्तांसाठी निधी म्हणून द्यावी, अशीही मागणी यावेळी अ‍ॅड. पुनाळेकर यांनी यावेळी केली.
सनातन संस्थेची नाहक बदनामी केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती अ‍ॅड. पुनाळेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

जितेंद्र आव्हाड यांनी ‘आदर्श’ इतिहास तपासावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड हे ‘सनातन’वर टीकेची झोड उठवत असल्याबाबत अ‍ॅड. पुनाळेकर म्हणाले, आव्हाड हे वारंवार ‘सनातन’वर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. ‘सनातन’ची त्यांना अनेक प्रकरणे आठवत असतील तर मुंबईत ‘आदर्श’ सोसायटीप्रकरणी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांना आपल्या ‘फ्लॅट’चा उल्लेख करण्यास का विसर पडला? याबाबतचा त्यांचा ढोंगीपणा आपण बाहेर काढू, असेही ते म्हणाले.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाराष्ट्रात अनेक घोटाळे केलेत. त्यांनी शासनाचे दोन कोटी रुपये बुडविले असून, त्यापासून बहुजनांचे लक्ष विचलित करण्यासाठी सनातन संस्थेवर वारंवार बंदी घालण्याची मागणी ते करीत असल्याचाही आरोप अ‍ॅड. पुनाळेकर यांनी केला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, गणेशमूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण, मूर्तीसमोर पशुबळी या विषयांवरही चर्चा केली. या पत्रकार परिषदेस अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, डॉ. मानसिंग शिंदे, राजन बुनगे हे उपस्थित होते.

Web Title: For the 'Rudra', the army of the advocates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.