कोल्हापूरात महापुराचा रुद्रावतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 02:38 AM2019-08-06T02:38:16+5:302019-08-06T02:38:22+5:30
पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
कोल्हापूर : पंचगंगेसह कोयना, कृष्णा आणि वारणा अशा चार प्रमुख नद्यांना महापूर आल्याने शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी तालुक्यांतील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. महापुराचा फटका बसलेल्या शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आदी सहा तालुक्यांतील पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंचगंगेला पूर आल्याने २०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले. काही गावांतील विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. बस्तवाड, कोथळी, कुरुंदवाड; हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, इंगळी गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. रत्नागिरीकडे जाणारे प्रमुख रस्ते खचले आहेत.
सांगली, साताऱ्यात पूरस्थिती
सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नदीकाठ महापुराच्या मगरमिठीत सापडला आहे. धोकादायक पातळी ओलांडून नद्यांचे पाणी लोकवस्त्यांमध्ये शिरल्याने प्रमुख मार्ग बंद होण्याबरोबर हजारो लोकांच्या स्थलांतराचे काम सुरू झाले आहे. १०७ गावांचा संपर्क तुटला आहे. सांगली-इस्लामपूर मार्ग बंद झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पूरस्थिती आहे. कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय. प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठच्या १८० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जावळी तालुक्यात तर डोंगराला भेगा पडल्याने भूस्खलनची भीती निर्माण झालीय. पुरामुळे नदीकाठचा भाग पाण्यात जाण्याची चिन्हे दिसत आहेत.