कोल्हापूरात महापुराचा रुद्रावतार, ९५ बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 06:06 PM2019-08-05T18:06:59+5:302019-08-05T18:28:57+5:30
मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून, सोमवारी सहा तालुक्यांतील शेकडो गावांच्या वेशी ओलांडून महापुराच्या पाण्याने थेट गावांनाच विळखा घातला. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी तालुक्यांतील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी ४८. ५ असून एकूण ९५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजना ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे .
कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून, सोमवारी सहा तालुक्यांतील शेकडो गावांच्या वेशी ओलांडून महापुराच्या पाण्याने थेट गावांनाच विळखा घातला. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी तालुक्यांतील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी ४८. ५ असून एकूण ९५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजना ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे .
ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संघटना कार्यकर्त्यांची पुरती दमछाक झाली. महापुरामुळे सामान्यांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. अनेक गावांतील विद्युत पुरवठा बंद होऊन त्यांचा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला. महापुराचा फटका बसलेल्या पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर शहरातील नदीकाठच्या नागरी वस्तीत तीन ते चार फुटांनी पाणी शिरल्यामुळे रविवारी (दि. ४) रात्री १0 वाजल्यापासून शहरवासीयांची प्रचंड तारांबळ उडाली. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुमारे २00 हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले.
नजिकच्या शाळा, हॉलमधून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापुराचा मोठा फटका शहर पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. सोमवारी दुपारपासून संपूर्ण यंत्रणा पाण्यात बुडाल्याने पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. ऐन पावसाळ्यात कोल्हापूरवासीयांना ‘पाणीबाणी’ला सामोरे जावे लागणार आहे.
संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. शनिवार (दि. ३)पर्यंत जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत फारशी काळजी वाटत नव्हती; परंतु कोयना, कृष्णा, वारणा आणि पंचगंगा अशा चार प्रमुख नद्यांना एकाच वेळी महापूर आला असल्याने पाण्याची फूग सुद्धा वाढत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणून नदीकाठच्या अनेक गावांत तसेच कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीत पाणी शिरले; त्यामुळे सर्वांच्याच छातीचे ठोके चुकले आहेत. पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुरचे पाणी आहे.
कोल्हापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वगळता अन्य चोहोबाजंूचे प्रमुख रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले आहेत; त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राज्य मार्ग तसेच तालुक्यातील जिल्हामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. जिल्ह्यातील दळणवळणाची यंत्रणा विस्कळीत होण्याबरोबरच शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. गावागावांतील संपर्कही तुटला आहे. काही गावांतील विद्युत पुरवठा बंद असून, तेथे काळोख पसरला आहे.
शिरोळ तालुक्यातील बस्तवाड, कोथळी, कुरुंदवाड; हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, इंगळी या गावांना बेटाचे स्वरूप आले असून, तेथील ग्रामस्थांना होडी, रबरी बोटीच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आदी सहा तालुक्यांतील पाच हजारांहून अधिक व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पन्हाळा, वाडीरत्नागिरी, मसाई पठाराकडे जाणारे प्रमुख रस्ते खचले असून, या मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. रस्ते खचण्याच्या, घराच्या भिंती पडण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.
राधानगरी धरण भरून सातही स्वयंचलित दरवाजे उघडले असून, धरणातून ११,४०० क्युसेक पाणी बाहेर फेकले जात आहे. तुळशी नदीवरील तुळशी धरणही सोमवारी पूर्ण क्षमतेने भरले. सकाळी साडेआठ वाजता एक हजार क्युसेक पाणी धरणातून बाहेर पडत होते. दूधगंगा धरणातील वक्राकार दरवाजातून पाणी सोडण्यात येत असून, या धरणातील सात हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
कोल्हापुरात प्रमुख बंद अलेले रस्ते
1.व्हीनस काॅर्नर
2.फोर्ड काॅर्नर
3.जयंती नदी
4.कलेकटर आॅफिस चौक
5.बंसत -बहार रोड, पाटलाचा वाडा
6.बावडा- शिये
7.कोल्हापुर- पन्हाळा
8.कोल्हापुर-सांगली बायपास
9.पंचगंगा स्मशानभुमी-जुना बुधवार
10.कुंभार गल्ली
11.लक्ष्मीपुरी
12. शाहुपूरी
13. सिद्धार्थनगर
14.पंचगंगा तालीम
15.लक्षतीर्थ
16.मस्कुती तलाव
17.परीख पुल