गड्या आपला गावच बरा...
By Admin | Published: June 18, 2016 12:45 AM2016-06-18T00:45:06+5:302016-06-18T00:47:53+5:30
हद्दवाढीविरोधात भावना : विकासाबाबत विश्वास निर्माण करण्याची गरज
राजाराम लोंढे ---कोल्हापूर --शहर परिसरातील ग्रामपंचायती नागरिकांना मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे पुरवत असताना कोल्हापूर शहरात येण्याचा आग्रह कशासाठी? केवळ करासाठी शहरात घेण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्याला आमचा विरोध राहणारच. शहर व उपनगरांतील सोयी-सुविधा पाहता, आम्ही आमच्या गावात सुखी आहोत, अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागांतून उमटत आहेत.
शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेल्या काही महिन्यापासून ऐरणीवर आला आहे. शहराला लागून असलेल्या गावांना विचारात न घेताच सरकारने निर्णय घ्यावा, असा महापालिकेचा आग्रह आहे; तर अगोदर शहरातील नागरिकांना सुविधा पुरवा आणि मगच हद्दवाढीचा विचार करा, अशी भूमिका प्रस्तावित हद्दवाढीतील गावांतील नागरिकांची आहे. हद्दवाढीविरोधात अठरा गावे व दोन औद्योगिक वसाहतींनी शुक्रवारी काम बंद करून आपला निषेध नोंदविला. दैनंदिन व्यवहारांसोबत दुकानांसह सर्व कामे बंद ठेवून कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ देणार नाही, असा निर्धार केला.
हद्दवाढीला नेमका विरोध का, याबाबत ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांनी तीव्र शब्दांत हद्दवाढीस विरोध केला. पाणी, वीज, गटारींसह सर्व सुविधा ग्रामपंचायत अगदी माफक दरात देत असताना कशासाठी शहरात जायचे, शहरात फायद्यापेक्षा तोटाच अधिक आहे.
महापालिकेच्या सुविधा वापरता; मग शहरात का येत नाही, असे शहरातील नेते म्हणत आहेत; पण के. एम. टी.सह इतर सुविधा देऊन आमच्यावर कोण उपकार करीत नाही, त्यासाठी आम्ही पैसे मोजतो. हद्दवाढीबाबत जनमताच्या विरोधात जाऊन सक्ती कराल तर याद राखा, टोलमुक्तीसारखे जनआंदोलन हद्दवाढीविरोधात उभे केले जाईल, असा इशारा या गावातील लोकांनी यावेळी दिला.
शहर विकासाच्या बाबतीत मॉडेल करा, ग्रामीण जनतेमध्ये विश्वास निर्माण करा, मग लोक आपोआप शहरात येतील; पण मुळात शहर सुविधांबाबत भकास असताना आम्हाला त्यात कशाला ओढता? आमचा संसार गुण्यागोविंदाने सुरू आहे, त्यात माती टाकू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत.
महापालिकेत ३५ वर्षे नोकरी केली. तिथे येणाऱ्या सामान्य माणसाची काय अवस्था होते, ते डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे आम्हाला आगीत उडी मारण्यास कोणी सांगू नये. - लक्ष्मण गाडगीळ (पाचगाव)
ुविरोध : त्यामागील विविध कारणे
मूलभूत सुविधांबाबत खात्री नाही.
करांचा बोजा अंगावर
शेतीसह मोकळ्या जागांवर आरक्षण पडण्याची शेतकऱ्यांना भीती
जनावरे सांभाळणे अवघड होईल.
ग्रामीण भागात माफक दरात सोयीसुविधा उपलब्ध होतात.
शहरात राहण्याबाबत फारशी उत्सुकता दिसत नाही.