रॅगिंग प्रकरण : ‘जवाहर नवोदय’च्या रेक्टरना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 02:28 PM2019-01-18T14:28:05+5:302019-01-18T14:36:35+5:30
कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १५ हून अधिक मुलांना मारहाण करून रॅगिंग करणाऱ्या सात मुलांवर केंद्रीय विद्यालयाच्या पुणे उपायुक्तांनी कारवाई केली आहे. तसेच यामध्ये हलगर्जीपणाचा ठपका ठेवत रेक्टरनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी उपायुक्तांना पाठविलेल्या अहवालासोबत संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाईबाबत अभिप्राय दिला होता.
कोल्हापूर : कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १५ हून अधिक मुलांना मारहाण करून रॅगिंग करणाऱ्या सात मुलांवर केंद्रीय विद्यालयाच्या पुणे उपायुक्तांनी कारवाई केली आहे. तसेच यामध्ये हलगर्जीपणाचा ठपका ठेवत रेक्टरनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी उपायुक्तांना पाठविलेल्या अहवालासोबत संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाईबाबत अभिप्राय दिला होता.
गेल्या महिन्यात जवाहर नवोदय विद्यालयातील १५ हून अधिक विद्यार्थ्यांना ११वीच्या विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते; त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने शाळा व्यवस्थापनाला चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार प्राचार्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी करून अहवाल दिला. यानंतर हा अहवाल जिल्हाधिकाºयांनी उपायुक्तांना पाठविला. त्यासोबत या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, संंबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा अभिप्राय दिला होता. त्याची दखल घेत उपायुक्तांनी या सात विद्यार्थ्यांवर कारवाई केली.
यातील पाचजणांचे रायगड, गोवा व सातारा येथील जवाहर नवोदयच्या शाळेत स्थलांतर केले. तर उर्वरित दोघाजणांनी जायला नकार देत खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणार असल्याचे सांगितले आहे.
या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उद्ध्वस्थ होऊ नये, यासाठी निलंबनाऐवजी या शाळेतून बाहेर काढण्याची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. तसेच रेक्टरच्या निष्काळजीपणामुळेच इतकी मोठी घटना घडल्याने त्यास जबाबदार धरून त्यांनाही उपायुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.