मल्लेवाडीत गव्यांचा धुडगूस
By admin | Published: January 28, 2015 12:42 AM2015-01-28T00:42:54+5:302015-01-28T01:01:00+5:30
वनविभाग सुस्त : दहा एकरांतील पिके उद्ध्वस्त
म्हालसवडे : तेरसवाडी (ता. करवीर) पैकी मल्लेवाडी, भोगमवाडी व कदमवाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून गव्यांनी धुडगूस घातला आहे. मल्लेवाडीतील दहा एकर क्षेत्रांतील ऊस, शाळू, मका व वरणा पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले आहे. वनविभागाने जंगली प्राण्यांचा व गव्यांचा बंदोबस्त ताबडतोब करावा, अशी मागणी होत आहे.
दाजीपूर अभयारण्यातील गवे ओल्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागताच तुळशी व धामणी परिसराकडे येत आहेत. सलग चौथ्या वर्षी गवे सातेरी डोंगरमाथ्यावरील लोळजाई परिसरातील जंगली भागात उन्हाळ्याच्या दिवसांत वस्ती करू लागले आहेत. या परिसरातील मल्लेवाडीतील नागरिकांना या प्राण्यांनी हैराण करून सोडले आहे.
पाझर तलाव व विहिरींच्या पाण्यावर ऊस, गहू, शाळू, मका व वरणा अशी उन्हाळी पिके घेतली जातात. परिसरात सलग चार वर्षे गव्यांच्या तीन ते चार कळपांचे वास्तव्य वाढू लागले आहे. सध्या येथे सात गव्यांचा कळप दाखल झाला आहे. मल्लेवाडी येथील खजिना नावाच्या शेतातील तुकाराम आवाड, निवृत्ती आवाड, शिवाजी आवाड, बळवंत पेंढरे, तुकाराम पेंढरे, सर्जेराव पेंढरे आदी शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त केली आहेत. याच परिसरातील कदमवाडी, भोगमवाडी, धनगरवाडा परिसरातही गव्यांची दहशत सुरू आहे. रात्री फटाके वाजवून, डबे वाजवून ग्रामस्थ हाका घालत शेतात थांबत आहेत. नुकसानीची शासनाने चौकशी करून नुकसानभरपाई द्यावी व गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वारंवार मागणी करूनही शासनाने अथवा वनविभागाने येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
- बाजीराव पाटील, शेतकरी, मल्लेवाडी
ग्रुप ग्रामपंचायत तेरसवाडीपैकी मल्लेवाडी, कदमवाडी, भोगमवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे गव्यांनी नुकसान केल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व गव्यांचा बंदोबस्त करावा.
- एम. जी. पाटील,
ग्रामसेवक तेरसवाडी