चांदी व्यवसायाच्या प्रगतीसाठी शासन प्रयत्नशील
By Admin | Published: August 28, 2016 12:33 AM2016-08-28T00:33:54+5:302016-08-28T00:33:54+5:30
दीपक केसरकर : हुपरी येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) व परिसरातील चांदी व्यावसायिकांना संपूर्ण देशभर फिरून निर्भयपणे व्यवसाय करता यावा यासाठी जरूर त्या सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील. चांदी व्यवसायाच्या प्रगतीसाठी शासन सदैव प्रयत्नशील राहून पाठबळ देण्यास कटिबद्ध असेल, असे प्रतिपादन गृह व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
शिवसेना जिल्हा व हुपरी शहरच्यावतीने आयोजित समारंभात ते बोलत होते. आमदार डॉ. सुजित मिणचेकर अध्यक्षस्थानी होते.
केसरकर म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगून शिवसैनिकांच्या पाठबळवर शिवसेना राज्यकारभार करीत आहे. राज्यातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी, श्रमिक, गोरगरीब जनता व महिला अशा सर्व घटकांच्या उद्धारासाठी शिवसेना सदैव कार्यरत राहिली आहे. हुपरी व परिसरातील चांदी व्यवसायाला ऊर्जितावस्था आणणे व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे. आज, रविवारी शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. आण्णासाहेब बिलुरे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पाटील, संजय वार्इंगडे, संताजी देसाई, संभाजी हांडे, गणेश कोळी, नितीन काकडे, बाजीराव पाटील, उदयसिंह शिंदे, बाजीराव आरडे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)