नियमात ! तरीही दहीहंडी दणक्यात
By admin | Published: August 26, 2016 12:56 AM2016-08-26T00:56:24+5:302016-08-26T01:14:26+5:30
वीस फुटाचा ‘थर’थराट : कोल्हापूरकरांनी अनुभवली शिस्तीची दहीहंडी; आकर्षक विद्युत रोषणाई; डीजेवर तरुणाई थिरकली
कोल्हापूर : दहीहंडीसाठी २० फूट उंचीचा उच्च न्यायालयाचा नियम, डॉल्बीच्या आवाजावर नियंत्रण अशा नियमांच्या बंधनातही गुरुवारी कोल्हापूरकरांनी अपूर्व जल्लोषात यंदाची दहीहंडी साजरी केली. दहीहंडीचा ‘थर’थराट जरी कमी असला तरी शिस्तीतही उत्सवाचा पूरेपूर आनंद घेण्याचा आदर्श कोल्हापूरकरांनी यावेळी घालून दिला. तासगाव येथील शिवगर्जना गोविंदा पथक, शिवाजी युवक मंडळ, शिरोळ गोडीविहीर, श्रीकृष्ण गोविंदा पथक, शिरढोण या मंडळांनी यंदा मोजक्याच दहीहंडी फोडल्या.
शहरातील बहुतेक सर्व मोठ्या दहीहंडी आयोजक मंडळांनी नियमाला अधीन राहून दहीहंडी साजरी करण्याचा निश्चय गुरुवारी सकाळपासूनच केला होता. त्यामुळे गुजरी, शिवाजी चौक, आझाद गल्ली, गंगावेश, लक्ष्मीपुरी, बालगोपाल तालीम मंडळ, जयशिवराय तरुण मंडळ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाची संबंधित आयोजकांकडून सकाळपासून तयारी सुरू होती.
दरवर्षी शिरोळ येथील अनेक गोविंदा पथक मोठ्या संख्येने कोल्हापुरातील दहीहंडी फोडण्यासाठी येतात मात्र यंदा नियमाची अंमलबजावणी होणार म्हटल्यावर अनेक मंडळांनी न येणेच पसंत केले.
दिवसभर पावसानेही विश्रांती घेतली होती. रात्री सातनंतर दोन बेस असलेली साऊंड सिस्टिम काही ठिकाणी दणाणू लागली. काही मंडळांनी जरी छोटी साऊंड सिस्टीम लावली असली तरी आवाजाची मर्यादा सांभाळली होती. रात्री आठनंतर तर अनेक छोट्या मंडळांच्या दहीहंडी फुटल्या होत्या. या आनंदाचा क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. अनेकजण हे फोटो ‘व्हॉटस् अप’द्वारे शेअर करत होते.(पान ३ वर)
‘उंची कमी, पैसेही कमी’
यंदा उच्च न्यायालयाने उंचीची मर्यादा घातल्याने मंडळाच्या बक्षिसावरही परिणाम झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. गेली काही वर्षे लाखोंची बक्षिसे लावणारी मंडळांनी यंदा १० ते २० हजार इतक्याच रकमेचा बक्षिसावर गोविंदा पथकांची बोळवण केल्याचे चित्र होते. अनेक मंडळांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
‘युवा शक्ती’च्या दहीहंडीची उणीव
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत ‘पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची दहीहंडी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या धनंजय महाडिक ‘युवा शक्ती’ची दहीहंडी यंदा प्रथमच रद्द करण्यात आली. या रद्द झालेल्या दहीहंडी कार्यक्रमाची चर्चा गुरुवारी अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती.
छोटी साऊंड सिस्टीम दणाणली
यंदा पोलिस प्रशासन व अन्य सामाजिक संघटनांच्या ‘नो डॉल्बी’च्या आवाहनाला अनेक मंडळांनी प्रतिसाद दिला. त्यात डॉल्बीऐवजी छोट्या साऊंड सिस्टीम लावून दहीहंडीचा आनंद द्विगुणित केला. यामध्ये दोन बेस व दोन टॉप काही ठिकाणी लावण्यात आले. त्यामध्ये ‘सैराट’,‘डिजेवाले बाबा जरा गाना लगा दे..’, आदी गाण्यांची धून सर्वत्र लावण्यात आली होती. आधीच थरांची मर्यादा, त्यात मोठ्या डॉल्बीवर बंदी आल्याने तरुणाईच्या उत्साहाला काही प्रमाणावर लगाम लागल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.
न्यू गुजरी मित्रमंडळाची दहीहंडी गडहिंग्लजच्या संघर्ष गु्रपने फोडली.
कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाच्या दहीहंडीवर गोडीविहीरची मोहोर
श्री पंत अमात्य बावडेकर आखाड्याची दहीहंडी फोडण्याचा मान श्रीकृष्ण गोविंदा पथकाला
छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाची दहीहंडी तासगाव येथील ‘शिवाजी युवक मंडळा’ने फोडली.
गंगावेशच्या दहीहंडीचा मान ‘शिरोळ’च्या अध्यक्ष ग्रुपला.