coronavirus : मंत्री, आमदारांना नियम नाहीत का?, एकीकडे रोज नियमांचे फतवे आणि दुसरीकडे नेतेमंडळींचे मेळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 12:11 PM2022-01-05T12:11:31+5:302022-01-05T12:13:24+5:30
‘गाेकुळ’प्रमाणेच आता जिल्हा बँकेचा निकाल लागला की मग जनतेवर निर्बंध लादले जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर : कोरोनाबाबतचे नियम मंत्री, खासदार आणि आमदारांना नाहीत का, असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातून रोज नियमांचे फतवे काढले जात आहेत आणि दुसरीकडे नेतेमंडळी मेळावे घेत आहेत, असे विरोधाभासी चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. ‘गाेकुळ’प्रमाणेच आता जिल्हा बँकेचा निकाल लागला की मग जनतेवर निर्बंध लादले जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या बंदिस्त सभागृहात ५० जणांच्या उपस्थितीत विवाह समारंभ आणि २० जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार असे नियम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. परंतु जिल्हा बँकेच्या निमित्ताने जिल्हाभर मंत्री, खासदार आणि आमदार शेकडो जणांचे मेळावे घेऊन फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हीच मंडळी नंतर तालुक्याला बैठका घेऊन कोरोनाचे रुग्ण वाढवत असून, काळजी घ्या, असे आवाहन करताना दिसणार आहेत.
‘गोकुळ’च्या निवडणुकीवेळीही अशीच परिस्थिती होती. कोराेनामुळे तीनहून अधिक ठरावधारकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच या निवडणुकीनंतरही कोरोनाबाधितांचा आकडाही वाढला होता. तेव्हाही निकाल लागल्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले होते. आताही जिल्हा बँकेची शुक्रवारी मतमोजणी झाल्यानंतर पुन्हा जनतेवर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
अनेक राज्ये फिरलेले मतदार येणार घरी
जिल्हा बँकेच्या सेवा संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेले २०/२२ दिवस सहा तालुक्यांतील अनेक ठरावधारक विविध राज्यांतून फिरतीवर आहेत. ते आता बुधवारी संध्याकाळनंतर आपापल्या घरात जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा बाहेर पाहुणचार झोडून घरात आल्यानंतर त्यांच्यामुळे आणखी कोणाला लागण होऊ नये याची दक्षता घ्यावी लागणार आहे.