घरातून काम करण्यासाठी नियमांची चौकट केली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 01:08 PM2020-04-29T13:08:14+5:302020-04-29T13:09:56+5:30

भविष्यात व्हर्च्युअल शिक्षण हेच सर्वव्यापी असेल. त्यासाठी केंद्र शासनाने देशात तयार झालेले स्वदेशी तंत्रज्ञान सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत उपलब्ध कसे करून देता येईल, याबाबत मार्गदर्शन व पायाभूत सुविधा उपलब्ध करावी, असे मुद्दे

 Rules must be framed to work from home | घरातून काम करण्यासाठी नियमांची चौकट केली पाहिजे

 कोल्हापुरातून मंगळवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी‘व्हीसी’द्वारे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी संवाद साधला. यावेळी आय.टी. क्षेत्राची सद्य:स्थितीसह विविध विषयांवर चर्चा झाली.

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांशी ‘व्हीसी’द्वारे संवाद

कोल्हापूर : कोरोनामुळे भविष्यात निदान आय.टी. क्षेत्रात तरी घरातूनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) ही नित्याची गोष्ट होऊन जाईल. त्यामुळे राज्यातील माहितीचे संरक्षण आणि सुरक्षा, चांगले इंटरनेट नेटवर्क यांची पूर्तता करण्याचे आव्हान मोठे असेल. या सर्वांचा विचार करून या संदर्भातील पायाभूत सुविधा उभारणे व घरातून काम करण्याच्या नियमांची चौकट तयार करण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचना मंगळवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद व केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासमोर ‘व्हीसी’द्वारे मांडली.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद व केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आय. टी. क्षेत्राची सद्य:स्थिती व कोरोनानंतरच्या काळातील रोडमॅप निश्चित करण्यासंदर्भात आय. टी. क्षेत्राची भविष्यातील वाटचाल व धोरणासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली.

येणाऱ्या काळामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये डिजिटलायझेशनची वाढ होणार आहे. अशावेळी सायबर गुन्ह्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत पुढाकार घेऊन ही समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक संशोधकांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, रोबोटिक्स आणि हेल्थकेअर क्षेत्रांत बरेच नवीन संशोधन केले आहे.

यासारख्या संशोधकांना किंवा संशोधन संस्थांच्या नवनवीन शोधांना मंजुरी देण्यासाठी तसेच ते प्रत्यक्षात वापरात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक खिडकी योजना आखावी. भविष्यात व्हर्च्युअल शिक्षण हेच सर्वव्यापी असेल. त्यासाठी केंद्र शासनाने देशात तयार झालेले स्वदेशी तंत्रज्ञान सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत उपलब्ध कसे करून देता येईल, याबाबत मार्गदर्शन व पायाभूत सुविधा उपलब्ध करावी, असे मुद्दे पालकमंत्र्यांनी यावेळी चर्चेत मांडले.

‘फिनटेक कॅपिटल’साठी केंद्र सरकार सहकार्य करील : पालकमंत्री
महाराष्ट्र राज्य हे मुंबईला फिनटेक कॅपिटल म्हणून उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. जागतिक बाजारपेठेतील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आमचे हे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

 

Web Title:  Rules must be framed to work from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.