बांधकामासाठीच्या अवजड वाहनांच्या वापराचे नियम बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:38 AM2020-07-01T11:38:52+5:302020-07-01T11:40:32+5:30
बांधकामासाठीच्या अवजड वाहनांच्या गैरसोईच्या आणि दंडाचा भुर्दंड लादणाऱ्या नियमांत अखेर बदल झाला आहे. उंची ११ वरून १४ फुटांपर्यंत वाढवण्यात आल्याने अर्थमूव्हिंग वाहनधारकांच्या बऱ्याच वर्षांच्या मागणीला यश आले आहे.
कोल्हापूर : बांधकामासाठीच्या अवजड वाहनांच्या गैरसोईच्या आणि दंडाचा भुर्दंड लादणाऱ्या नियमांत अखेर बदल झाला आहे. उंची ११ वरून १४ फुटांपर्यंत वाढवण्यात आल्याने अर्थमूव्हिंग वाहनधारकांच्या बऱ्याच वर्षांच्या मागणीला यश आले आहे.
कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी उठविलेला आवाज आणि केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी १९८९ च्या नियमांत बदल केल्याची घोषणा केली आहे. याचा लाभ देशभरातील वाहनधारकांना होणार आहे.
बांधकामासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या ट्रेलरसह इतर वाहनांतून नेल्या जाणाऱ्या मालासाठी ११ फूट इतकी उंचीची मर्यादा होती. इतर मालवाहतुकीच्या वाहनांपेक्षा ही वाहने उंचीला एक फुटाने जास्त असतात. त्यांची मानके आंतरराष्ट्रीय मानकानुसार ठरविली जातात. अशा वाहनांमध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांतून अवजड यंत्रसामग्रीची वाहतूक करताना कोट्यवधीचा दंड भरावा लागत आहे. दंड भरेपर्यंत हे वाहन थांबवून ठेवले जात असल्यामुळे सर्व कामांचा खोळंबा होत होता.
देशभरातील पायाभूत प्रकल्पांसाठीची यंत्रसामग्री कोल्हापुरातून जाते. त्यामुळे या यंत्रांची वाहतूक करताना होणाऱ्या अडचणी येथील वाहनधारकांना जास्त जाणवत होत्या. कोल्हापूर जिल्हा अर्थमूव्हर्स असोसिएशनने यात बदल करण्याची मागणी सातत्याने लावून धरली.
खासदार संजय मंडलिक यांच्याकडेही या शिष्टमंडळाने पाठपुरावा करीत केंद्रीय मंत्र्यांकडे ही तांत्रिक बाजू मांडावी, असा आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार मंडलिक यांनी हा प्रश्न मनावर घेऊन सोडविला.
याबद्दल अर्थमूव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील-सडोलीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार मंडलिक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभार मानले. यावेळी अभय देशपांडे, प्रताप कोंडेकर, श्रीकांत घाडगे, निवृत्त परिवहन अधिकारी रवींद्र भागवत, राजाराम मगदूम, महेश धनवडे, संजय कसबेकर, संजय नाळे, अमोल पाटील, श्रीकांत घाटगे, संजय पाटील, दीपक नलवडे, रंगराव पाटील, सुरेश कुऱ्हाडे, विज्ञान मुंडे, नितीन पाटील उपस्थित होते.
दंडातून कायमची सुटका
मोटार वाहन कायदा १९८९ मधील नियमानुसार अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनाची उंची ३.६ मीटर अर्थात ११ फूट आहे. त्यात आता सुधारणा झाल्याने ही उंची ४.७५ मीटर अर्थात १४ फूट इतकी झाली आहे. उंचीत तीन फुटांनी वाढ झाल्याने आता दंडातून कायमची सुटका झाली आहे.