सत्तारूढ गटाची डोकेदुखी वाढणार
By admin | Published: November 4, 2014 12:38 AM2014-11-04T00:38:12+5:302014-11-04T00:43:38+5:30
‘गोकुळ’ निवडणूक : मतदार यादी; विरोधक एकवटणार; जुन्या मतदार यादीचा निर्णय न्यायप्रविष्ट
राजाराम लोंढे - कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ची आगामी निवडणूक नवीन मतदार यादीनेच होण्याची दाट शक्यता आहे. ‘गोकुळ’ची मतदार यादी तयार करून दोन वर्षे होऊन गेल्याने नवीन सहकार कायद्यानुसार ही यादी अद्ययावत करावी लागणार आहे; पण जुन्या मतदार यादीबाबत न्यायालयात दोन याचिका प्रलंबित असल्याने न्यायालय काय निकाल देते, यावर मतदार यादीचे भवितव्य राहणार आहे.
‘गोकुळ’च्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबर २०१२ मध्येच संपली आहे. जिल्हा प्रशासनाने जुलै २०१२ पासूनच संघाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. प्राथमिक मतदार यादी, त्यावरील हरकती व अंतिम मतदार याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत; पण गेलीदोन वर्षे राजकीय मंडळींनी सोयीसाठी वेगवेगळी कारणे पुढे करत संघाची निवडणूक लांबणीवर टाकली. आता प्राधिकरणाच्यावतीने पात्र संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी मुदत संपल्याने येत्या महिन्याभरात ‘गोकुळ’च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. संघाची कच्ची मतदार यादी, त्यावरील हरकती व पक्की मतदार यादी तयार झाली आहे. त्यामुळे थेट निवडणुकीचा कार्यक्रमच घोषित होईल, असे अनेकांना वाटत आहे; पण तसे होण्याची शक्यता कमी आहे. नवीन सहकार कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत तयार झालेली यादी ग्राह्य मानली जाते. दोन वर्षांपूर्वी यादी तयार करण्यात आल्याने निश्चितच नव्याने यादीची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
दोन वर्षांपूर्वी ठराव गोळा करताना इच्छुकांच्या नाकात दम आला होता. एक ठराव ‘लाख’मोलाचा झाला होता. त्यात त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. राष्ट्रवादी कॉँग्रेसची मंडळी हमीदवाडा साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुंतली होती. त्यामुळे ठराव गोळा करण्यात राष्ट्रवादी मागे होती. दोन वर्षांत सर्वच समीकरणे बदलल्याने आगामी निवडणुकीत वेगळीच समीकरणे उदयास येणार आहेत. नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा निर्णय झाला तर पुन्हा ठरावधारकांचा ‘भाव’ वधारणार असल्याने इच्छुकांची पुन्हा दमछाक होणार. त्याचबरोबर ‘गोकुळ’मधील सत्तारूढ गटाचे नेते आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांचे विरोधक एकवटणार, हे निश्चित आहे. विरोधक ताकदीने उतरले तर ठरावाचा भाव आणखी वधारणार असल्याने सत्तारूढ मंडळींची डोकेदुखी वाढणार आहे.
दरम्यान, जुनी मतदार यादी पात्र-अपात्रतेबाबत न्यायालयात दोन याचिका दोन वर्षांपूर्वी दाखल झाल्या आहेत. या याचिकेवर न्यायालय काय निकाल देते, त्यावरच मतदार यादीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका या नवीन पोटनियमानुसार होणार आहेत. क्रियाशील, अक्रियाशील सभासदांचा निकष लावला जाणार नाही; परंतु मतदार यादी नव्यानेच तयार करावी लागणार. ‘गोकुळ’ची जुनी मतदार यादी न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाचा निकाल काय लागतो, यावरच नवीन की जुन्या मतदार यादीचा निर्णय अवलंबून आहे.
- मधुकर चौधरी
(आयुक्त, निवडणूक प्राधिकरण)
‘पिशवी’तील संस्थांना शेवटची संधी!
नवीन सहकार कायद्यानुसार क्रियाशील संस्थाच मतदानास पात्र ठरू शकतात. हा निकष लावला तर ‘गोकुळ’शी संलग्न सुमारे १५०० कागदोपत्री (पिशवीतील) दूध संस्था मतदानास पात्र ठरू शकत नाहीत; पण नवीन कायदा १४ फेबु्रवारीपासून लागू झाल्याने मागील पाच वर्षांत ते क्रियाशील नव्हते, असे म्हणता येत नसल्याने अशा संस्थांना मतदानाची शेवटची संधी मिळणार आहे.