Kolhapur- सभासदांची एकी; ‘बिद्री’त पुन्हा ‘के. पी.’च
By विश्वास पाटील | Published: December 5, 2023 12:35 PM2023-12-05T12:35:21+5:302023-12-05T12:36:33+5:30
एकतर्फी विजयाने आबीटकर, मंडलिक, ‘ए. वाय’ना धोबीपछाड : सर्व उमेदवार ५६३० च्या मताधिक्यांनी विजयी
दत्ता लोकरे
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील आदींच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्वच्या सर्व २५ जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवत सत्ता कायम राखली. विरोधी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबीटकर, भाजपचे समरजीत घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना धोबीपछाड देत ‘बिद्री’त पुन्हा ‘के. पी.’च ‘लै भारी’ हे सभासदांनी दाखवून दिले. गेल्यावर्षी तीन हजारांचे मताधिक्य होते, त्यापेक्षाही अधिक ५६३० इतके प्रचंड मताधिक्य घेत सर्व २५ उमेदवार विजयी झाले.
‘बिद्री’कारखान्याच्या सत्तेसाठी गेली महिनाभर सत्तारुढ व विरोधकांनी निकराचे प्रयत्न केले. ‘साम, दाम, दंड’ सगळ्या नीतीचा वापर सर्रास झाला. या निवडणुकीत ए. वाय. पाटील यांनी सत्तारुढ तर माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी विरोधकांची साथ सोडल्याने ‘राधानगरी व भुदरगड तालुक्यातील समीकरणे बदलली होती. सत्ता कायम राखण्यासाठी तर विरोधकांनी परिवर्तनासाठी कंबर कसली होती.
करवीर, राधानगरी, भुदरगड व कागल तालुक्यांतील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या ‘बिद्री’च्या २५ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी रविवारी ५६ हजार ९१ सभासदांपैकी ४९ हजार ९४० (८९ टक्के) मतदान झाले होते.
मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून शाहू मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉन येथे १२० टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. यामध्ये, सत्तारुढ महालक्ष्मी विकास आघाडीने पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. हे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिले. सरासरी साडेतीन हजाराच्या फरकाने सर्व २५ जागांवर दणदणीत विजयी मिळवत कारखान्याच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यात माजी आमदार के. पी. पाटील हे यशस्वी झाले. विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
सत्यजित जाधव सर्वाधिक मतांनी विजयी
विजयी पॅनेलमध्ये २९१०१ इतकी मते घेऊन पहिल्या क्रमांकाने सत्यजित जाधव विजयी झाले. त्यांच्या पाठोपाठ के. पी. पाटील यांनी २८६९३, प्रवीणसिंह पाटील यांनी २८५५२ तर रावसोा खिलारी यांनी २८३०८ मते घेतली.
मुश्रीफांचे भाकीत...‘ ए. वाय.’ यांची डिपॉझीट
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘बिद्री’च्या निवडणुकीत ए. वाय. पाटील यांची डिपॉझीट जप्त होणार, असे भाकीत वर्तविले होते. ‘ए. वाय.’ यांचा तब्बल ५१२३ मतांनी पराभव झाला.
दाजी पराभूत, मेहुणा विजयी !
अध्यक्ष के. पी. पाटील हे विजयी झाले तर त्यांचे दाजी व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे पराभूत झाले शिवाय सरवडेच्या राजेंद्र पाटील यांनी त्यांचे मामा विठ्ठलराव खोराटे यांचा पराभव केला. मुरगूडचे प्रवीणसिंह यांनी लहान बंधू रणजितसिंह यांचा पराभव केला. अध्यक्ष के. पी. पाटील यांचे भाचे सुनील सूर्यवंशी आणि व्याही गणपतराव फराकटे हे विजयी झाले, तर माजी संचालक के. जी. नांदेकर आणि जयवंत पाटील हे सासरे व जावई दोघेही पराभूत झाले.