kdcc bank election : सत्तारूढ गटाच्या पॅनेलची येत्या रविवारी घोषणा, आज होणार नावांवर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 11:26 AM2021-12-17T11:26:05+5:302021-12-17T11:38:36+5:30
शिवसेनेला नऊ जागांमध्ये जागा वाढवून देणे, अशक्य असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तर, आमदार प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीवर सूचक वक्तव्य केले.
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी सत्तारूढ गटाचे पॅनेलबाबत आज, शुक्रवारच्या बैठकीत चर्चा करुन नावांवर शिक्कामोर्तब केले जाईल. मात्र अधिकृत घोषणा रविवारी केली जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना गुरुवारी दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, आघाडीची मोट बांधताना सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना याबाबत कल्पना दिली आहे. त्यामुळे माघार घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
शिवसेनेने जरी चार जागांची मागणी केली असली तरी नऊ जागांमध्ये देणे अडचणीचे आहे. त्यांना समजावून सांगू. आज सायंकाळी सहा वाजता आम्ही सर्वजण बसणार आहे. त्यामध्ये पॅनेलला अंतिम स्वरुप दिले जाईल. माघारीसाठी दोन दिवस मिळावेत, म्हणून रविवारी पॅनेलची घोषणा करणार आहे.
या वेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, युवराज पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय संस्थांचे संचालक मंडळ २५ चे
जिल्हा व राज्यस्तरीय संस्थांचे कार्यक्षेत्र मोठे असते. राज्यात ३६ जिल्हे आहेत, आणि राज्य बँकेवर २१ संचालक कसे जाणार. यासाठी केंद्र सरकारच्या सहकार कायद्यात राज्याने अनेक बदल केेले आहेत. त्यानुसार आता जिल्हास्तरीय संस्थांचे संचालक मंडळ २५चे होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
शिवसेनेला दोनच जागा मिळणार
निवेदिता माने या आता शिवसेनेत गेल्या असल्या तरी गेली ३०-३५ वर्षे जिल्हा बँकेत आमच्यासोबत आहेत. संजय मंडलीकांबाबतही तसेच आहे. नऊ जागांमध्ये जागा वाढवून देणे, अशक्य असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
आवाडे यांच्या उमेदवारीला ‘पी. एन.-कोरें’ची मान्यता
आमदार प्रकाश आवाडे यांनी पतसंस्था गटातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीला आमदार पी. एन. पाटील व आमदार विनय काेरे यांनी मान्यता दिली आहे. पॅनेल जाहीर होईल, त्यावेळी समजेल. असे सूचक वक्तव्य मंत्री मुश्रीफ यांनी केले.
मुलाखतीसाठी राष्ट्रवादीचे ४१ जण हजर
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ४१ इच्छुकांच्या मुलाखती मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतल्या. यावेळी बहुतांशी जणांना माघार घेण्याची सूचना केली. भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आसिफ फरास, आर. के. पोवार आदींनी मुलाखती दिल्या.