BS4 वाहनांवर मिळतेय बंपर सूट? अफवांमुळे शोरुमचे कर्मचारी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 02:48 PM2020-03-11T14:48:19+5:302020-03-11T16:51:58+5:30
सर्व प्रकारच्या बी. एस. फोर वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंतच केली जाणार आहे. त्यामुळे अशी वाहने विक्रेते कमी किमतीत विकत असल्याच्या अफवांचे पीक उठले आहे. प्रत्यक्षात अशी वाहनांची उपलब्धता नगण्य असून तीही नियमित किमतीलाच विक्री केली जात आहेत.
कोल्हापूर : सर्व प्रकारच्या बी. एस. फोर वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंतच केली जाणार आहे. त्यामुळे अशी वाहने विक्रेते कमी किमतीत विकत असल्याच्या अफवांचे पीक उठले आहे. प्रत्यक्षात अशी वाहनांची उपलब्धता नगण्य असून तीही नियमित किमतीलाच विक्री केली जात आहेत.
देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बी.एस.फोर मानांकनाच्या सर्व प्रकारची वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंत करावी; नोंदणी न झालेली वाहने स्क्रॅप केली जावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अशा शिल्लक राहिलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांचे करायचे काय, असा प्रश्न वितरकांपुढे पडला आहे, असा समज अनेकांनी करून घेतला आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर अमुक एक गाडी अमुक किमतीला किंवा ५० टक्के कमी किमतीत अशा एक ना अनेक अफवांचे पीक उठले आहे. प्रत्यक्षात अशा स्वरूपाचे कोणतीही सूट वितरकांकडून दिली जात नाही. उलट काही प्रकारच्या दुचाकी ग्राहकांना हव्या असतानाही त्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाहीत; त्यामुळे अशा बीएसफोर वाहनांची उपलब्धता नगण्य असून किमतीही नियमितच आहेत.
नोंदणीसाठी उरले काही दिवस
अशी वाहने ज्यांनी खरेदी केली आहेत, त्यांनी ती २० मार्च २०२० पर्यंत कागदपत्रांची पूर्तता करून गुढीपाडवा (दि. २५) हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसह घरी नेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. त्यामुळे बी.एस.फोर वाहनांच्या नोंदणीसाठी अवघे १० ते १५ दिवस उरले आहेत.
हेल्मेट देणे बंधनकारक
दुचाकीची विक्री केल्यानंतर विक्रेत्याने ग्राहकांना दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. वाहन नोंदणी करताना बंधपत्र सादर करणे बंधनकारक आहे. हेल्मेट दिले नसल्याचे आढळून आले तर अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी स्पष्ट केले आहे.