हुल्लडबाजांना मिळणार ‘खाकी’चा प्रसाद
By admin | Published: December 30, 2014 12:02 AM2014-12-30T00:02:05+5:302014-12-30T00:05:42+5:30
‘थर्टी फर्स्ट’ची तयारी : जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त; चौकाचौकांत नाकाबंदी असणार
कोल्हापूर : ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौकाचौकांत नाकाबंदीसह वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून, रात्रगस्त वाढविण्यात आली आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री मद्यप्राशन करून सुसाट वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या हुल्लडबाजांना ‘खाकी’चा प्रसाद दिला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली. त्यामुळे मद्यप्राशन करणाऱ्यांसह वाहनधारकांची धडकी भरली आहे.
‘थर्टी फर्स्ट’दिवशी उत्साही तरुण मद्यप्राशन करून सुसाट वेगाने वाहने चालवीत मोठमोठ्याने ओरडत असतात. अशावेळी अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेसह हॉटेलमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक हॉटेलची कसून तपासणी सुरू आहे. शहरातील शिवाजी पूल, तावडे हॉटेल, कावळा नाका, कसबा बावडा, दसरा चौक, कळंबा नाका, वाशी नाका, सायबर चौक, उमा टॉकीज, गंगावेश, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, माउलीचा पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, आदी ठिकाणी २० ते २५ पोलिसांचे पथक आज, सोमवारपासूनच तैनात करण्यात आले आहे. वाहनांतील गॅस किटच्या तपासणीसह लायसेन्स, वाहनांची कागदपत्रे,तसेच मद्यपान करून
वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बनावट, अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरील वाहनांची विशेषत: प्रवासी एस. टी. बस, ट्रॅव्हल्स गाड्या व खासगी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
हॉटेलसह धाबे पहाटे पाचपर्यंत खुले
नवीन वर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी बुधवारी रात्रीपासून शहरासह जिल्ह्यातील धाबे, हॉटेल व रिसॉट गुरुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. यामध्ये परवानाधारकांचा समावेश असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दारू पिऊन वाहने चालवू नये
‘थर्टी फर्स्ट’दिवशी उत्साही तरुण मद्यप्राशन करून सुसाट वेगाने वाहने चालवीत मोठमोठ्याने ओरडत असतात. अशावेळी अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक
डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केले आहे.
जिल्हा पोलीस
अधीक्षक : १
अप्पर पोलीस
अधीक्षक : १
पोलीस उपअधीक्षक : ४
पोलीस निरीक्षक : ७
सहायक पोलीस
निरीक्षक : १४
पोलीस उपनिरीक्षक : २०
पोलीस कर्मचारी : १०००
रात्रगस्तीचे पोलीस बेपत्ता
शहरात चोरट्यांचा धुमाकूळ : कसबा बावडा, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, पुईखडी परिसरात घरफोड्यांची मालिका
कोल्हापूर : अतिसंवेदनशील असलेल्या कोल्हापूर शहरातील पोलीसच बेपत्ता झाल्याने शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. लागोपाठ घरफोड्यांची मालिकाच सुरू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. दोन दिवसांत चोरट्यांनी सुमारे दहा लाख किमतीचा ऐवज लंपास केला आहे.
चेन स्नॅचर, घरफोडी, लूटमार, दुचाकी चोरींच्या वाढत्या घटनांमुळे शहर हादरले. कसबा बावडा, ताराबाई पार्क, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, पुईखडी, आदी ठिकाणी दोन दिवसांत दहा ते बारा घरफोड्या झाल्याने पोलिसांची झोपच उडाली. रात्रगस्तीचे पोलीसच बेपत्ता झाल्याने घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
लक्षतीर्थ वसाहतीमध्ये मुनीर ऊर्फ मुन्ना अजीज मुजावर यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी नेकलेस, गंठण, कुडे-जुबे, अंगठ्या, चेन, रोख रक्कम, असा सुमारे दोन लाख किमतीचा मुद्देमाल चोरून नेला; तर शिवाजी नानासो पाटील (मूळ गाव तारळे खुर्द, ता. राधानगरी) यांच्या पुईखडी येथील घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी प्रापंचिक साहित्य चोरले.
चोरट्यांनी कसबा बावड्याला लक्ष्य केले असून, सलग दोन दिवसांत आठ घरफोड्या झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे घर बंद करून बाहेरगावी जाणे नागरिकांनी बंद केले आहे. (प्रतिनिधी)