पराभव दिसत असल्यानेच न्यायालयात धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:23 AM2021-04-25T04:23:37+5:302021-04-25T04:23:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी, आवश्यकतेपेक्षा जादा नोकरभरती करताना मांडलेला बाजार, वासाचे दूध आणि मल्टिस्टेटला विरोध करण्यासाठी आम्ही ही निवडणूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी,
आवश्यकतेपेक्षा जादा नोकरभरती करताना मांडलेला बाजार, वासाचे दूध आणि मल्टिस्टेटला विरोध करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवीत असून, आमची सत्ता आल्यास शेतकरी भगिनींना दुधाला दोन रुपये दर जादा देऊन वासाच्या दुधाला योग्य भाव मिळवून देऊ. सत्ताधारी आघाडीला आपला पराभव दिसू लागल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात संघाचे आठ कोटी रुपये खर्च केले असल्याचा घणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. कूर (ता. भुदरगड) येथील श्रीराम मंगल कार्यालयात गोकुळच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील होते.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, दर पंधरा दिवसांनी ऐंशी लाख रुपयांचे टँकरचे भाडे घेऊन चाळीस टँकर आपले असल्याचे सांगणाऱ्या महाडिक यांनी वीस वर्षांत किती कोटी मिळविले? हे एकदा जाहीर करावे. माजी खासदार महाडिक यांनी २०१७ ला जाहीर भाषणात महाडिक यांचा एकही टँकर नाही म्हणाले होते. मग आज चाळीस टँकर असल्याची जाहीर कबुली दिली. यावरून गोकुळची सत्ता का हवी आहे, हे स्पष्ट होते.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, गोकुळमधील एकाधिकार आणि झुंडशाही मोडून काढून फंदी फितुरी मोडून काढण्यासाठी नाव न पाहता चिन्हाकडे बघून शिक्का मारून या आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, आजपर्यंत सत्ताधारी आघाडीच्या विरोधी आघाडी करण्यासाठी उमेदवार मिळत नव्हते, पण आज सत्ताधारी आघाडीलाच विरोधी आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपली आघाडी जाहीर करावी लागली आहे. मल्टिस्टेटला विरोध केल्याने सर्वसामान्य ठरावधारकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. मल्टिस्टेट करू इच्छिणाऱ्या सत्ताधारी आघाडीला स्वाभिमानी ठरावधारक त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.
या बैठकीत अरुणकुमार डोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले, तर रणजितसिंह पाटील यांनी उमेदवारांची ओळख करून दिली.
प्रमुख उपस्थितीत खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रा. बाळकाका देसाई, के. जी. नांदेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष बी. एस. देसाई, मधुकर देसाई, सचिन घोरपडे, सभापती कीर्ती देसाई, जि.प. सदस्या रोहिणी आबिटकर, जि.प. सदस्य जीवन पाटील, सुनीलराव कांबळे, पं.स. सदस्य संग्रामसिंह देसाई, प्राचार्य अर्जुन आबिटकर, कल्याणराव निकम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, बाबा नांदेकर, शिवाजीराव ढेंगे, काँग्रेसचे शामराव देसाई, अविनाश शिंदे यांच्यासह सर्व उमेदवार, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ठरावधारक उपस्थित होते.
प्रास्ताविक दत्ताजीराव उगले यांनी केले. प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांनी आभार मानले.
फोटो ओळ
गोकुळच्या प्रचारार्थ कूर येथील ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ. सोबत विजय देवणे, के. पी. पाटील, मंत्री सतेज पाटील, आमदार आबिटकर, ए. वाय. पाटील, आदी उपस्थित होते. २) मंत्री सतेज पाटील बोलताना सोबत के. पी. पाटील, हसन मुश्रीफ, आमदार आबिटकर, आदी उपस्थित होते.