पाेलिसांची घरे शोधण्यासाठी धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:46+5:302021-04-18T04:22:46+5:30
कदमवाडी : पोलीस मुख्यालयातील ११० घरे पाडून तिथे नवीन इमारत बांधण्यात येणार असल्याने तेथे वास्तव्यास असणाऱ्या पोलिसांच्या ७० ...
कदमवाडी : पोलीस मुख्यालयातील ११० घरे पाडून तिथे नवीन इमारत बांधण्यात येणार असल्याने तेथे वास्तव्यास असणाऱ्या पोलिसांच्या ७० कुटुंबांना घरे खाली करण्याच्या नोटिसा धाडण्यात आल्याने ऐन संचारबंदीत पोलिसांवर नवे घरे शोधण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. १५ दिवसांत घरे खाली करण्याची नोटीस पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनीता नाशिककर यांनी दिली आहे. मुख्यालयातील जुन्या लाईनमधील बालविहारनजीकच्या पाच लाईन पाडून पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळाकडून तिथे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी सध्या ११० खोल्या असून ७० खोल्यांत पोलिसांची कुटुंबे राहत आहेत. येथील २२ खोल्या शासकीय वापरासाठी, तर १८ खोल्या रिकाम्या आहेत.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर पोलीस दलास ७०० घरकुले मंजूर झाली असून सध्या मुख्यालयातील बालविहारनजीकच्या पाच लाईन पाडून तिथे नव्या इमारती बांधण्यात येणार आहेत. यासाठी सध्या तिथे वास्तव्यास असणाऱ्या ७० पोलीस कुटुंबांना १५ दिवसांत घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या असणारी संचारबंदी, कडक निर्बंध या पार्श्वभूमीवर बंदोबस्त सांभाळत पोलिसांना घरासाठी शोधाशोध करावी लागत आहे.
सध्या वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर बाहेर घरे भाड्याने घर मिळणे अवघड झाले. त्यामुळे घरे सोडण्यासाठी एक-दोन महिन्यांचा अवधी मिळावा, अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
सात कोठरीचा पर्याय योग्य...
सध्या कसबा बावड्यातील भगव्या चौकाशेजारी असणारी सात कोठरी पोलीस वसाहत बंद असून तिथे थोडीफार डागडुजी करून या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करता आली असती किंवा आता जे बांधकाम करण्यात येणार आहे, ते सात कोठरी येथे केले असते तर सोयीचे झाले असते, असे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
फोटो : १७ पोलीस वसाहत
ओळ : कोल्हापूरच्या पोलीस मुख्यालयातील जुनी लाईन व त्या ठिकाणी सध्या बांधकामाच्या दृष्टीने जमिनीची तपासणी सुरू झाली आहे.
(छाया-दीपक जाधव)