जादा प्रवासी वाहतूक करणारे आरटीओच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 03:14 PM2020-05-31T15:14:24+5:302020-05-31T15:23:50+5:30
यापुढेही तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याने बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अल्वारीस यांनी केले आहे.
कोल्हापूर : लॉकडाऊन काळात मान्यतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणारे आरटीओच्या रडारवर आले आहेत. आरटीओंनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, कडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. यात दोन रिक्षा आणि दोन कार अशा चार वाहनांवर कारवाईही करण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी दिली.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर प्रवाशांची संख्या निश्चित करून सार्वजनिक वाहतुकीला परवानगी दिली गेली. त्यानुसार रिक्षामध्ये दोन, कारमध्ये तीन असा नियम घालून देण्यात आला, तथापि मर्यादांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू केली. यात चारजण उल्लंघन करीत असल्याचे आढळले. रिक्षा क्रमांक एम एच ०९ जे ५९३३ मधून १० प्रवासी प्रवास करीत होते. एम एच ०९ ईएल ०८१८ या रिक्षातून ४ जण प्रवास करताना आढळले. मारुती ओम्नी एमएच ०९ वाय ००७७ यातून ९, महिन्द्रा लोगॉन एमएमच ०२ डीबी ०३०४ या कारमधून पाचजण प्रवास करीत होते. मोटार वाहन कायद्यानुसार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव यांनी ही कारवाई केली.
यापुढेही तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याने बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अल्वारीस यांनी केले आहे.