हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे पळपुटे सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:50+5:302021-09-21T04:25:50+5:30
कोल्हापूर : भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल या भीतीपोटी ...
कोल्हापूर : भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल या भीतीपोटी त्यांनाच चार भिंतीआड दडवण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचाच प्रकार असल्याची टीका भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केली आहे.
सोमय्या यांना कोल्हापूरला येण्यापासून रोखण्याच्या प्रकाराबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ठाकरे सरकारवर टीका केली आहे. चिकोडे पत्रकात म्हणतात, कोरोनाच्या संकटास तोंड देण्याऐवजी ठाकरे सरकारने जनतेस घरात बसावयास भाग पाडले. त्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला. शाळांना कुलपे लावून विद्यार्थ्यांना घरात बंद केले, त्यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला. आता कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यासाठी नाकर्ते ठाकरे सरकार सरसावले आहे, हेच सोमय्या यांच्यावरील कारवाईवरून स्पष्ट दिसत आहे.
हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उघडी पडली आहेत आणि सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत. यामुळे अस्वस्थ असलेले पक्षाचे कार्यकर्ते सरकारी पाठबळावर पोलिसांदेखत हाणामाऱ्या करीत असून, कायदा, सुव्यवस्था स्थिती बिघडवत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा घटना रोखण्याऐवजी ज्यांना त्यापासून धोका आहे, त्यांनाच ताब्यात घेते, असे प्रकार रोखण्याची हिंमत नसल्याचीच कबुली ठाकरे सरकार देत आहे.