विनाचालक धावली ‘केएमटी’ बस
By admin | Published: March 4, 2015 10:05 PM2015-03-04T22:05:30+5:302015-03-04T23:45:17+5:30
कागल येथील घटना : सेंट्रो कारचे नुकसान
कागल : वेळ सकाळी ६ वाजून १५ मिनिटांची. कागलचा गैबी चौक ते पोलीस ठाण्यापर्यंतचा रस्ता हे २०० मीटरचे अंतर ‘केएमटी’ बस विनाचालक धावली. सुदैवाने सकाळी वर्दळ नसल्याने आणि बसही एका कारला धडकून थांबल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. संतप्त नागरिकांनी बसच्या एका चाकाची हवाही सोडली. या घटनेत सेंट्रो कारचे नुकसान झाले; मात्र हे प्रकरण आपापसांत मिटविण्यात आले. कागल मुक्कामाच्या दोन बसेस कागल पोलीस ठाण्याच्या आवारात असतात. पहाटे साडेपाच वाजता यापैकी एक बस कोल्हापूरला रवाना झाली, तर दुसरी बस (एमएच ०९ बीसी २१७३) कोल्हापूरला जाण्यासाठी संबंधित चालकाने गैबी चौकात नेऊन लावली. एअर ब्रेकमुळे हवेचा दाब तयार करण्यासाठी बस चालू ठेवली. बसचे तोंड कोल्हापूरकडे होते. चालक हॅँडब्रेक न लावताच चहा घेण्यासाठी शेजारच्या टपरीवर गेला. यावेळी बस चालू असल्याने हादऱ्याने हळूहळू पुढे सरकत बस धावू लागली. गैबी चौक ते नाळे कापड दुकानापर्यंतचा रस्ता उताराचा असल्याने हा प्रकार घडला. बसमध्ये चालक नसताना बस धावत असल्याचे पाहून नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर संबंधित चालक-वाहकाला याची कल्पना आली. तोपर्यंत बसने रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या सेंट्रो गाडीला धडक देऊन तिलाही ढकलत तलाठी कार्यालयापर्यंत नेले. सेंट्रो कार गिअरमध्ये असल्याने बसचा वेग मंदावला आणि दोन्ही वाहने थांबून पुढील अनर्थ टळला. यामध्ये सेंट्रो कारचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)