फुटलेला गुडघा घेऊन धावला आणि जिंकलाही, आजऱ्यातील धावपटू सुनील शिवणेची यशकथा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 01:31 PM2022-05-17T13:31:20+5:302022-05-17T13:37:02+5:30
गेल्या रविवारी नाशिकमधील मॅरेथॉनमध्ये पडल्यामुळे गुडघा फुटला होता. त्यातूनही काल रविवारी तो बंगळुरूमधील मॅरेथॉनमध्ये धावला आणि चक्क दुसऱ्या क्रमांकाने विजयीही झाला.
कोल्हापूर : शिक्षण बारावी. अर्ध्या एकर शेतात जे पिकेल त्यावर गुजराण. परंतु धावण्याची प्रचंड जिद्द. गेल्या रविवारी नाशिकमधील मॅरेथॉनमध्ये पडल्यामुळे गुडघा फुटला होता. त्यातूनही काल रविवारी तो बंगळुरूमधील मॅरेथॉनमध्ये धावला आणि चक्क दुसऱ्या क्रमांकाने विजयीही झाला. आजरा तालुक्यातील चिमणे गावचा जिद्दी धावपटू सुनील ईश्वर शिवणे याची ही यशकथा.
शेतकरी कुटुंबातील सुनीलचे शिक्षणही दहावीपर्यंत झालेले. प्रथेप्रमाणे मुंबईत जाऊन नोकरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु कमी उंची असल्याने अनेकदा नकार येऊ लागला. अखेर सुनील यांनी गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. गावाकडची शेती बघता बघता धावण्याची त्याची आवड जोपासू लागला. सन २००० पासून सराव सुरू करत त्यांनी विविध शर्यतींमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. २००६ पर्यंत तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. बंगळुरू, राजस्थान आणि गुवाहाटी येथे झालेल्या या तीन स्पर्धांनी त्यांना आत्मविश्वास दिला.
तेव्हापासून सुनील आपली आवड जोपासत आहेत. गेल्या रविवारी नाशिक येथील मॅरेथॉनवेळी सुनील पडून जखमी झाले. गुडघा फुटला. अशातच बंगळुरू येथील टाटा टीसीएस मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचा त्यांनी आधीच निर्णय घेतला होता. परंतु गुडघ्याची परिस्थिती पाहून घरच्यांनी विरोध केला. तो विरोध डावलून सुनील यांनी भाग घेतला आणि ४० वर्षावरील गटात दुसरा क्रमांक पटकावला. मिळालेल्या बक्षिसातील काही पैसे पुढच्या स्पर्धेसाठीच्या प्रवासाला वापरायचे असे त्यांचे नियोजन असते.
संस्थात्मक पाठबळाची गरज
कधी अरळगुंडी रस्त्यावर तर कधी बेलेवाडी, पिंपळगाव घाटातून सराव सुनील यांनी कायम ठेवला आहे. थोडीशी शेती, घरच्या जबाबदाऱ्या. यामुळे त्यांना अनेक मर्यादा आहेत. परंतु धावण्याच्या शर्यतीमध्ये कायम सातत्य ठेवणाऱ्या सुनील यांना संस्थात्मक पाठबळाची गरज आहे.