दरवाजाविना वेगात धावली
By admin | Published: May 26, 2015 12:34 AM2015-05-26T00:34:29+5:302015-05-26T00:52:36+5:30
महामंडळाचा निष्काळजीपणा--एस.टी.बस प्रवाशांचा जीव धोक्यात :
प्रदीप शिंदे ल्ल कोल्हापूर
सध्याच्या कडक उन्हाळ्यामुळे सर्वत्र उकाडा जाणवत आहे अशातच मिरज-कोल्हापूर ही एस.टी. दरवाजाशिवाय सोमवारी धावली. चालकाशेजारील दरवाजाच गायब झाल्याने मिरजेपर्यंत चालक व प्रवाशांनी रस्त्यावरील गरम हवा खातच अंतर कापले. दरवाजा बसविण्यास मध्यवर्ती बसस्थानकातील आगार कार्यशाळेने वेळेअभावी असमर्थता दाखविल्याने प्रवासी व एस.टी. कर्मचाऱ्यांंमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सध्या ‘सुरक्षित प्रवास’ म्हणून एस.टी.कडे पाहिले जाते. मात्र, प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस या तिन्ही संकटांचा सामना करत एस.टी.मधून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र, डेपोतील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. त्याचा प्रत्यय सोमवारी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आला.
मोडकळीस आलेल्या खिडक्या, काचा नसणे, टफ हेलकावे खाणे, कर्णकर्कश आवाज येणे अशा स्थितीत अनेक गाड्या धावत असतात. नादुरुस्त स्वरूपातील गाड्या रस्त्यावर धावत असल्यामुळे येथून शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, प्रवाशांची व नोकरदारांची मोठी गैरसोय होते.
याबाबत संबंधित वरिष्ठ आगार व्यवस्थापक एस. एम. कांबळे यांच्याकडे चौकशी केली असता. असा प्रकार येथे घडला आहे का, हे पाहावे लागेल, असे सांगून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मिरज डेपोतील एस.टी. सोमवारी कोल्हापुरात आली असता, चालकाच्या बाजूचा दरवाजा मोडून पडला. चालकाने मध्यवर्ती बसस्थानकातील आगार कार्यशाळेत जाऊन दरवाजा मोडकळीस आल्याची बाब सांगितली. मात्र, येथील कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीस वेळ लागेल, असे सांगितले. त्यावर चालकाने तशीच गाडी पुढे दामटली. कर्मचाऱ्याने या गंभीर गोष्टीकडे लक्ष दिले नाही. या प्रकारामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बस प्रवासाचा अनुभव काही विलक्षण असाच असतो. तुटलेले बाकडे, त्यावर कुशनचा अभाव, हे एस.टी.चे नेहमीचे बनले आहे. सोमवारी असाच वेगळा अनुभव आला. एस.टी. चालकाच्या शेजारील दरवाजा नसल्याने पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याने या गाडीतून मिरजेला जाणे टाळले.
- महादेव पाटील, प्रवासी.