धावपट्टी विस्तारली, कोल्हापूरच्या विमानसेवेला गती; ‘डीजीसीए’कडून परवानगी मिळताच नाईट लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 12:36 PM2022-04-07T12:36:44+5:302022-04-07T12:37:36+5:30

डेलायटिंग आयएफआरमुळे सध्या कमी दृश्यता असताना देखील विमानांचे उड्डाण कोल्हापुरातून करणे शक्य झाले आहे.

Runway extended, speed to Kolhapur Airlines Night landing with permission from DGCA | धावपट्टी विस्तारली, कोल्हापूरच्या विमानसेवेला गती; ‘डीजीसीए’कडून परवानगी मिळताच नाईट लँडिंग

धावपट्टी विस्तारली, कोल्हापूरच्या विमानसेवेला गती; ‘डीजीसीए’कडून परवानगी मिळताच नाईट लँडिंग

Next

कोल्हापूर : राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेत कोल्हापुरातील विमानतळाच्या धावपट्टीचे १९३० मीटरपर्यंत विस्तारीकरण पूर्ण झाले आहे. पूर्वीच्या १३७० धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी विमान उड्डाण संचालनालयाच्या (डीजीसीए) प्रतीक्षेत विमानतळ व्यवस्थापन आहे. डेलायटिंग आयएफआरमुळे सध्या कमी दृश्यता असताना देखील विमानांचे उड्डाण कोल्हापुरातून करणे शक्य झाले आहे.

विमानतळाची पूर्वीची धावपट्टी १३७० मीटर इतकी होती. मोठी विमाने उतरण्यासाठी ती वाढविणे आवश्यक होते. त्यानुसार ५६० मीटरने धावपट्टी वाढविण्याचे काम गेल्या तीन महिन्यापूर्वी पूर्ण झाले आहे. त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डीजीसीएने पाहणी करून परवानगी दिल्यानंतर या धावपट्टीवर एटीआरपेक्षा थोडी मोठी विमाने उतरविता येणार आहेत. त्यासह नाईट लँडिंग करता येणार आहे. न्यू ॲप्रन, रनवे ॲप्रन आणि टॅक्सी-वेचे देखील काम संपले आहे.

वाढीव धावपट्टीवरील नाईट लँडिंगचे ६० टक्के काम झाले असून उर्वरीत ४० टक्के विद्युतीकरणाचे काम पाऊस सुरू होण्यापूर्वी संपविण्यात येणार आहे. सध्याच्या ॲप्रनमध्ये एक विमान थांबविण्याची व्यवस्था होती. या ॲप्रनची क्षमता वाढल्याने आता तेथे तीन एटीआर, एक एअरबसची व्यवस्था झाली आहे. विमानाबाबत काही आपातकालीन स्थिती निर्माण झाल्यास त्याच्यासाठी आयसोलेशन-वे पूर्ण झाला आहे. कार्गोसेवेसाठी सीसीटीव्ही, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस (एसओपी), आदी सुविधांसह विमानतळ सज्ज आहे.

सुरुवातीला बॅले कार्गोसेवा (प्रवासी नसताना मालवाहतूक सेवा) पुरविण्यासाठी काही विमान कंपन्यांकडून ग्राऊंड होल्डिंग एजंट नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही क्षणापासून कार्गोसेवेची सुरुवात होईल. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशातील विविध ६१ विमानतळांबाबत ग्राहक (प्रवासी) समाधान सर्वेक्षण केले. त्यात कोल्हापूर विमानतळ ४.५५ मानांकनासह देशात ३९ व्या क्रमांकावर आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांचे पाठबळ

विमानतळ विस्तारीकरणासाठी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्ह्यातील तिन्ही खासदार, सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचे पाठबळ असल्याचे विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांनी सांगितले. धावपट्टीचे १९७० मीटरपर्यंत विस्तारीकरण झाले आहे. पूर्वीच्या धावपट्टीवरून नाईट लँडिंगसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. डीजीसीएकडून परवानगी मिळताच नाईट लँडिंग सुविधा सुरू होईल. विकास आराखड्यानुसार विमानतळाचे काम सुरू आहे. निधी उपलब्ध आहे. विविध कामे करणाऱ्या ठेकेदारांनी कामाची गती वाढविणे आवश्यक असल्याचे कटारिया यांनी सांगितले.

विमानसेवा वाढविण्यासाठी पाठपुरावा

कोल्हापुरातून हैदराबाद, तिरुपती सध्या रोज सुरू आहे. मुंबई, बंगळुरु सेवा तात्पुरती बंद असून, ती नियमितपणे सुरु ठेवण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. अहमदाबाद सेवा जूनपासून सुरु होईल. मुंबई, बंगळुरु मार्गावर सेवा सुरु करण्यासाठी घोडावत ग्रुपचे प्रयत्न सुरु असल्याचे कमल कटारिया यांनी सांगितले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर मात करून विमानसेवा आणि विस्तारीकरणाचे काम सुरु ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विमानतळ विस्तारीकरणात आणखी काय होणार?

  • टर्मिनल बिल्डिंगचे आतापर्यंत ६० टक्के काम झाले आहे. डिसेंबर २०२२पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे विमानतळ प्राधिकरणाचे प्रयत्न सुरु आहेत.
  • एटीआर ७२, एम्ब्ररर अशी मोठी विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरता यावीत, यासाठी धावपट्टी २,३०० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त ६४ एकर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गती मिळणार आहे.
  • सध्या एक टॅक्सी-वे करण्यात आला आहे. आणखी दोन टॅक्सी-वे केले जाणार आहेत.
  • विमानांना इंधन पुरविण्यासाठी विमानतळ येथे भारत पेट्रोलियमची सेवा सुरु होणार आहे.
  • एव्हिएशन ट्रेनिंग सेंटर सुरु करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून तीन एकर जागा दिली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव प्राधिकरणाने वरिष्ठ कार्यालयाला सादर केला आहे.

Web Title: Runway extended, speed to Kolhapur Airlines Night landing with permission from DGCA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.