ग्रामीण भागात ‘बैत्या’ला घरघर
By admin | Published: October 28, 2014 10:28 PM2014-10-28T22:28:38+5:302014-10-29T00:14:38+5:30
बलुतेदारांचे लक्ष नोकरी, करिअरकडे
शिवराज लोंढे - सावरवाडी -पूर्वी धान्याच्या रूपात बैतं घालण्याची प्रथा होती. सुगीच्या दिवसांत खळ्यावर भटक्या जमातीच्या लोकांची वर्दळ असायची. शेतकऱ्यांची वर्षभराची कामे बैत्यावर चालत असत. बदलत्या जमान्यात मात्र ही बैत्याची परंपरा नामशेष होऊ लागली आहे. त्यामुळे सुगीच्या दिवसांत ग्रामीण भागात बाराबलुतेदारांची खळ्यावरची वर्दळ कमी झाली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बैलाच्या औताचे लाकडी साहित्य बनविणे, खुरपी पाजविणे (धार काढणे), आवातणे देणे, गणपतीच्या मूर्ती देणे यांसारखी शेतकऱ्यांची कामे बाराबलुतेदार करून देत असत. शिक्षणामुळे ग्रामीण भागातील समाजाची प्रगती झाली. त्यामुळे बाराबलुतेदार वर्गातील सुशिक्षित पिढी नोकरी, उद्योगधंद्याकडे वळली. कच्च्या मालांच्या दरात वाढत्या महागाईमुळे बाराबलुतेदारांना शेतकऱ्यांना बैत्यावर सेवा देणे परवडत नाही.
त्यामुळे बैत देण्याची पूर्वीची प्रथा सध्या नव्या जमान्यात बंद पडू लागली आहे. जुन्या काळातील रूढी-परंपरा या नव्या पिढीला रुचल्या नाहीत. त्यामुळे बैतं देणे ही संकल्पना सध्या कालबाह्य होऊ लागली आहे. धान्याच्या मोबदल्यात सेवा देण्याऐवजी पैसे देऊन अथवा वस्तू विकत घेणे-देणे ही प्रथा सध्या सुरू झाली.
शेतीमध्ये सुशिक्षित लोक येत आहेत. त्यामुळे पैशांच्या मोबदल्यात वस्तूंची सेवा घेणे शेतकरीवर्ग अधिक पसंद करू लागला आहे. यामुळेही धान्यांच्या रूपात बैतं घालण्याची प्रथा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
बाजारपेठेत नव्या सुधारित पद्धतीची शेती औजारे, वस्तू मिळू लागल्या आहेत. त्यामुळे कुंभार, सुतार, लोहार कारागिरांची कलाही कमी होऊ लागली. जमाना बदलत असून नवनवीन संशोधन कृषी क्षेत्रात येऊ लागले. परिणामी जुन्या प्रथाही हळूहळू कमी होऊ लागल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.