गुटखानिर्मितीची पाळेमुळे ग्रामीण भागातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:39 AM2017-11-27T00:39:00+5:302017-11-27T00:40:03+5:30
संदीप बावचे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : दोन वर्षांपूर्वी कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे गुटखानिर्मिती कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीर गुटख्यावर कारवाई केली होती. पुन्हा कोंडिग्रे येथेच बेकायदेशीर गुटखा साठ्यावर कारवाई झाल्यामुळे गुटखानिर्मितीची पाळेमुळे ग्रामीण भागातच ठळकपणे जाणवत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणाºया अन्न-औषध प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे संशयाच्या सुईचा निर्देश होत आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा पाया खणून काढला पाहिजे. ज्यामुळे या दोन्ही खात्यांचीही जरब अबाधित राहिल्यास बेकायदेशीर गुटखानिर्मिती व विक्रीवर चाप बसणार आहे.
आघाडी सरकारच्या काळात गुटखाबंदीचा निर्णय झाला होता. मात्र, गुटख्यावरील बंदीचा निर्णय नावापुरता शिल्लक राहिला आहे. कारवाई होते, संशयित जामिनावर पुन्हा मोकाट सुटतात व नव्याने गुटखानिर्मितीचा उद्योग सुरू होतो, हे कोंडिग्रेच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. १५ सप्टेंबर २०१५ रोजी जयसिंगपूर पोलिसांनी कोंडिग्रे येथे गुटखानिर्मिती कारखान्यात छापा टाकून गुटखा मिक्सिंग करणाºया दोन मशिनरींसह विविध कंपन्यांचे पाऊचदेखील जप्त केले होते. सहा लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दहाजणांना अटक करण्यात आली होती. गुटखानिर्मितीचा मुख्य सूत्रधार हा इचलकरंजी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
या कारवाईनंतर गुटखा हद्दपार होईल, असे वाटत असताना कोंडिग्रे येथे बुधवारी (दि.२२) अन्न व औषध प्रशासन व पोलीस पथकाने छापा टाकून आठ लाख रुपयांचा गुटखा व एक लाख रुपये किमतीचे पॅकिंग मशीन व साहित्य जप्त केले. गुटखा वाहतूक करण्यासाठी आलेला टेम्पो गांधीनगर येथील असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले. मात्र, गुटखासाठा करण्यात आलेले गोडावून कोणाच्या मालकीचे, यामागील सूत्रधार कोण, याचा तपास करण्याचे आव्हान अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिसांसमोर आहे. गुटखानिर्मिती करणारे कारखाने ग्रामीण भागात पोहोचल्यामुळे यावर जरब बसविणार तरी कोण, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
जयसिंगपूर कनेक्शन
कोंडिग्रे येथे बुधवारी कारवाई झाली. यावेळी या कारवाईची कुणकुण संबंधिताला लागल्यामुळे या गोडावूनमध्ये टेम्पोचालकाव्यतिरिक्त अन्य कोणीही सापडले नाहीत. दोन वर्षांपूर्वी कारवाई झाली होती. त्या उद्योगाचा मुख्य सूत्रधार इचलकरंजी येथील असल्याचे स्पष्ट झाले होते, तर यावेळच्या या उद्योगाचा सूत्रधार जयसिंगपूर येथील असल्याची चर्चा आहे.
ग्रामीण भागात गुटख्याचा उद्योग
जैनापूर माळभाग येथे गुटखानिर्मिती करणारा कारखाना दोन महिन्यांपूर्वी बंद झाला होता. कारवाईची कुणकुण लागल्यानंतरच येथील गुटख्याचा साठा व पाऊच नष्ट करण्यात आले. ग्रामीण भागात कारवाई होत नसल्यामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. यामुळे कोंडिग्रे व जैनापूर या ग्रामीण भागात गुटखानिर्मितीचे उद्योग वाढले.