रंकाळ्यावर अवतरली ग्रामीण संस्कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:54+5:302021-03-10T04:23:54+5:30
अमर पाटील : कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या रंकाळा तलावावर पर्यटनाला चालना देण्यासाठी कोल्हापुरी ग्रामीण संस्कृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ...
अमर पाटील :
कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या रंकाळा तलावावर पर्यटनाला चालना देण्यासाठी कोल्हापुरी ग्रामीण संस्कृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे रंकाळ्याच्या वैभवात आणखी भर पडली आहे. रंकाळा उद्यान परिसरात हत्ती, पाणगेंडा ,दोन मगरी ,गवारेडा यांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूरच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या जात्यावर दळणारी स्त्री, दूधकट्टा आदी प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. तर ‘माय कोल्हापूर’,‘ आय लव्ह कोल्हापूर ’अशा अक्षरांच्या भव्य प्रतिकृतीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. येथील इराणी खाणीत उभारण्यात आलेला फ्लोटिंग फाउंटनही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. इराणी खाणीलगतच्या पक्षी निरीक्षण केंद्राभोवती पक्षांना आकर्षित करणाऱ्या विविध चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आल्याने हा परिसर हिरवाईने नटला आहे.
इराणी खण सजली...
एकेकाळी आत्महत्या आणि अपघात यासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या येथील सात खाणींचे रुपडे पूर्णपणे बदलून हा परिसर निसर्गरम्य परिसर बनल्याने आता पर्यटकांना भुरळ घालत आहे. रंकाळा उद्यानात विरंगुळा केंद्र, लहान मुलांना विविध प्रकारची खेळणी उभारण्यात आल्याने परिसरात सायंकाळी तोबा गर्दी उसळलेली असते.
कोट : रंकाळा तलाव कोल्हापूरच्या शिरपेचातील मानाचा तुरा असल्याने रंकाळा तलावास गतवैभव प्राप्त व्हावे, येथे लुप्त होत चाललेल्या ग्रामीण संस्कृतीची अनुभूती मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत. भविष्यात निधी उपलब्ध करून रंकाळा तलाव आदर्शवत बनवणार आहे.
- शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक
फोटो : ०९ रंकाळा उद्यान
ओळ
रंकाळा तलावावर ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय ‘आय लव्ह कोल्हापूर’ अक्षरांच्या भव्य प्रतिकृती तरुणाईला आकर्षित करत आहेत.