ग्रामीण विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:17 PM2018-07-04T23:17:43+5:302018-07-04T23:18:01+5:30
बाचणी : शाळांमध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहाराचा पुरवठा धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होऊन अठरा दिवस झाले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी या आहारापासून वंचित आहेत. पुरवठा करणाऱ्या ठेकेदार बदलाचा हा परिणाम असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी शाळा पातळीवरही या आहाराची सोय करण्यात आली नाही.
या आहारासाठी जिल्ह्याला महिन्याला सुमारे २००० ते २१५० टन इतके धान्य लागत असून, आतापर्यंत केवळ ८०० टनच पुरवठा झाला आहे. यातही शहरात ५००, तर ग्रामीण भागात केवळ २५० टन धान्य पुरवठा झाला आहे.
राज्यातील सर्व शाळांना पोषण आहारासाठी धान्य पुरवठ्याचा ठेका कंझ्युमर फेडरेशन कंपनीला देण्यात आला आहे. १५ जूनला शाळा सुरू झाली असून, आजपर्यंत ग्रामीण भगातील बहुतांशी शाळांत हा धान्य पुरवठा झालेला नाही. विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. ठेकेदाराच्या धान्य पुरवठ्याच्या धिम्या गतीमुळे पुरवठा होण्यास अजून किती दिवस लागतील हे मात्र प्रशासनातील कोणताच अधिकारी खात्रीशीर सांगत नाही. त्यामुळे पोषण आहाराचे धान्य शाळेत वेळेत पोहोचण्यावर प्रशासनातील कोणाचेही नियंत्रण नाही .
दरम्यान, धान्य पोहोचले नाही म्हणून संबंधित शाळांतील मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापकांनी मात्र याची कसलीच तजवीज केलेली दिसत नाही. कारण कोणत्याच शाळेने अखंडितपणे आहार दिलेला नाही. याकडे शिक्षण विभागानेही गांभीर्याने पाहिले नाही.
शिक्षक बदलीने नियोजनाचे तीनतेरा
गत महिन्यात शिक्षक बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली, पण त्यातील वाद मात्र अजूनही प्रलंबित आहेत. चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असून, याकडेच सर्व शिक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. या गोंधळात विद्यार्थ्यांना आहार देण्याचे मात्र कुणीच नियोजन केले नसल्याने त्याचा फटका ग्र्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. प्रशासनही याबाबत गंभीर नाही.